चाळीसगाव वासीयांच्या साक्षीने तितूर व डोंगरी मेळ नदीवरील नवीन पुलाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले लोकार्पण
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
काल दि.२५ रोजी विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो चाळीसगाव वासीयांच्या साक्षीने संपन्न झाला. यात तितूर–डोंगरी मेळ नदीवरील दत्तवाडी जवळील नवीन पुलाचे “संगम सेतू” नामकरण व लोकार्पण तसेच पाटणादेवी रोडपर्यंतचा पोच रस्ता भूमिपूजन करण्यात आले. चाळीसगाव शहराच्या मधोमध वाहणा-या डोंगरी व तितूर नदीमुळे जेव्हा शहराचे दोन भाग होतात तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले नदीवरील पूल हे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपयोगी पडणार आहे. यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाला लागून असणाऱ्या तितूर नदीचे पर्यटन दृष्टीने सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन (किंमत 5 कोटी) झाल्याने भविष्यात एक कुटुंबासह विरंगुळ्यासाठी चांगले पर्यटनस्थळ येथे विकसित होईल. चाळीसगावातील महिला बचत गटांसाठी बहिणा स्मार्ट या अद्ययावत व्यापारी संकुलाचे भूमिपूजन (किंमत 2.67 कोटी) करण्यात आले. चाळीसगाव नगरपरिषद जुन्या गिरणा धरण पाणीपुरवठा योजनेला मोठ्या प्रमाणात वीज वापर होत असल्याने गिरणा पंपिंग स्टेशन येथे 470 kw व जलशुद्धीकरण केंद्र डेराबर्डी येथे 340 kw क्षमतेचे व सुमारे 5 कोटी 36 लक्ष रु.निधीतून दोन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून त्यामुळे दर महिन्याला सरासरी 97000 युनिट वीज निर्मिती होणार आहे व वीज बिलात नगरपरिषदचे दरमहा रु. 7,77,400 रुपये इतकी आर्थिक बचत होणार आहे. म्हणजे वर्षाला चाळीसगाव वासीयांच्या कराच्या रुपात जमा होणाऱ्या ९३ लाख रुपयांची बचत होणार आहे. या महत्वाकांक्षी सौर प्रकल्पाचे देखील लोकार्पण संपन्न झाले. संगम सेतू या पुलाची विशेषतः म्हणजे पोर्टल फ्रेम ब्रिज प्रकारातील हा सेतू ८० मी. लांब तर १४ मी. रुंद आहे. उत्तर महाराष्ट्रात प्रथमचं असा हा पोर्टल ब्रिज येथे उभारण्यात आला आहे. आर.सी.सी. कॉंक्रिटपासून बनवलेला हा पूल असून यात मुख्य बीम व स्तंभ यांची एकत्रितपणे फ्रेमसदृश संरचना तयार करण्यात आले आहे. वाहनभार, वारा, पूर किंवा भूकंपीय भार अधिक कार्यक्षमतेने सहन करते. भूकंपास प्रतिरोध करण्यासह अनेक सुविधा यात एकवटल्या आहे. आधुनिक व हायटेक तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. केवळ नद्यांना नाही तर शहराच्या दोन विभिन्न भागांना जोडणाऱ्या या पुलाचे नामकरण संगमसेतू असे करण्यात आले आहे.













