ग्रीन झोनमध्ये बेकायदा प्लॉटिंगचा डाव? कोळकी परिसरात नागरिकांची फसवणूक होण्याची भीती
फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यातील कोळेकी हद्दीत, पालखी महामार्गालगत राव रामोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एका कथित प्लॉटिंग स्कीममुळे खळबळ उडाली आहे. सदर जमीन *कृषी व ग्रीन झोनमध्ये* असतानाही तिथे रहिवासी प्लॉट पाडून विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
*काय आहे प्रकरण?*
‘शिवायो ग्रीनसिटी पार्क’ या नावाने सुरू असलेल्या या स्कीममध्ये “भविष्यात येथे निवासी विकास होणार” असे सांगून नागरिकांना आकर्षित केले जात आहे. प्रत्यक्षात सदर जमीन महसूल दप्तरी शेती व ग्रीन झोन म्हणून नोंद असून, तिथे बिगरशेती (NA) परवानगी, टाऊन प्लॅनिंगची मंजुरी किंवा लेआऊट मंजुरी घेतल्याचे दिसून येत नाही.
*नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती:*
“ग्रीन झोनमध्ये प्लॉटिंग करून विक्री होत असेल तर भविष्यात खरेदीदार अडचणीत येणार नाहीत ना? घर बांधायला परवानगी मिळेल का? बँक कर्ज देईल का?” असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. ग्रीन झोनमधील जमिनीवर NA केल्याशिवाय बांधकाम करता येत नाही, हे माहीत असूनही एजंट लोकांची दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे.
*चौकशीची मागणी:*
संबंधित जमिनीचे कायदेसीर स्वरूप, टाऊन प्लॅनिंग मंजुरी व शासकीय परवानग्या आहेत का, याची *महसूल व नगररचना विभागाने तातडीने चौकशी करून* वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोळकी परिसरातील या चर्चित प्लॉटिंग स्कीमकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










