‘हरित फलटण संकल्प 2026’ अंतर्गत निसर्ग संवर्धनासाठी 3 लाख बियांचे उद्दिष्ट: सभापती शिवांजली भोसले यांचा पुढाकार
फलटण प्रतिनिधी: वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढत्या उष्णतेला आळा घालण्यासाठी फलटण पंचायत समितीने ‘हरित फलटण संकल्प 2026’ हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत निसर्ग संवर्धनासाठी तब्बल *तीन लाख बियांचे रोपण करून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट* ठेवण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या *सभापती शिवांजली भोसले* यांच्या पुढाकाराने या अभियानाची सुरुवात झाली. याबत माहिती देताना सभापती भोसले म्हणाल्या, “निसर्गाचे संवर्धन करणे आणि वृक्ष लागवडीसाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 2026 पर्यंत फलटण तालुका ‘ग्रीन फलटण’ म्हणून ओळखला जावा, यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
*असे राबवले जाणार अभियान:*
1. *लोकसहभागातून वृक्ष लागवड*: फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी *20 ते 30 हजार झाडांची प्रत्यक्ष लागवड* केली जाणार आहे.
2. *बिया संकलन*: शेतकरी, पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिकांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या देशी झाडांच्या बिया गोळा केल्या जातील.
3. *जनजागृती*: वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देऊन प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवावे, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
यावेळी झालेल्या बैठकीस तहसीलदार प्रसाद चौगुले, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शेतकरी तसेच सामाजिक संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती भोसले यांनी सर्वांना या ‘हरित फलटण’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
पर्यावरण रक्षणासाठी उचललेले हे पाऊल फलटण तालुक्याला हरित आणि समृद्ध बनवण्यासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










