फलटण प्रतिनिधी :
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव आणि सभेची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत आ. सचिन पाटील, प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवबाजीराजे खंडेकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, अॅड. नरसिंह निकम, विश्वासराव भोसले, विलासराव नवले आदी उपस्थित होते.
विरोधकांनी सांगितले की, विशेष सर्वसाधारण सभेतील काही निर्णय हे सभेच्या कार्यक्षेत्राबाहेरील असून, ते नियमबाह्य पद्धतीने मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सभेतील ठरावांना न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना विश्वासराव भोसले यांनी सांगितले की, कारखाना २००६ पासून तोट्यात चालत असल्याचे कारण देत प्रशासनाने विविध करार केले. मात्र, आजही कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कारखाना सहकारी तत्त्वावरच चालविण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अॅड. नरसिंह निकम यांनी सांगितले की, ज्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे, त्या मंडळाला इतक्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विरोधकांनी सभेतील वातावरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सभेमध्ये अनेक सभासदांना बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोप करत, लोकशाही पद्धतीने चर्चा न झाल्याचे त्यांनी म्हटले.
कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय घेताना शेतकरी सभासदांचे हित सर्वोच्च मानले जावे, अशी मागणी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.









