चाळीसगाव येथे हॉटेल चालकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
शहरातील धुळे रोड परिसरात एका हॉटेल चालकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत प्रफुल बापुसाहेब देशमुख (वय 34) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवरे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, प्रफुल देशमुख यांचे धुळे रोडवर “हॉटेल राणी पार्क” या नावाने हॉटेल आहे, त्यांचे हर्षल दिपक राठोड यांच्याशी काही दिवसापूर्वी पैसाच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्याच अनुषंगाने काल पैसेवरून आरोपीने रागाच्या भरात रविवारी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास प्रफुल देशमुख यांच्यावर हल्ला केला, प्रफुल देशमुख हे गेट जवळ वाहन लावत असताना एव्हिएटर स्कुटीवरून दोन जण आले. स्कुटीच्या मागे बसलेला हर्षल राठोड याने खाली उतरून जुन्या भांडणाचा राग काढत “तुला आज जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत धारदार शस्त्राने प्रफुल देशमुख यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात प्रफुल देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ दिनेश देशमुख त्यांचा मित्र स्वप्निल कोतकर घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहून आरोपी व त्याचा साथीदार स्कुटीवरून पसार झाले. जखमी अवस्थेत प्रफुल देशमुख यांना तत्काळ देवरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी हर्षल दिपक राठोड व त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध जीवघेणा हल्ला, शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असुन पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.










