सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा– जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा प्रतिनिधी : पश्चिम घाटातील डोंगर रांगांना जागतिक वारसा लाभलेला आहे. यात सर्वात जास्त स्थळे सातारा जिल्ह्यातील आहे. सातारा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून विकासित करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
पर्यटन विभाग, सातारा प्रशासनामार्फत पर्यटन स्थळांचा विकास, इको-टुरिझम आणि साहसी पर्यटन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अविस्मरणीय सातारा या उपक्रमांतर्गत पयटन विकास स्थानिक अर्थ वृद्धी या उपक्रमासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या कार्यशाळेस उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, पोलीस उपअधीक्षक श्री. नवले आदी उपस्थित होते.
कास, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड यासह जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळे आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, या सर्वांचा सर्वंकष पर्यटन विकासासाठी विचारमंचन करण्यासाठी पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना आपल्या जिल्ह्यातील पर्यटक स्थळांच्या ठिकाणी येण्यासाठी आकर्षित करावे ते या ठिकाणी आल्यानंतर निसर्ग सौंदर्य, आदातिथ्य, पर्यटनाशी संबंधित सोयी सुविधा यांचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम व्हावा, येथून गेल्यानंतर त्यांनी इथल्या सर्व चांगल्या अनुभवांची इतरांना माहिती देणे व त्यातून पुन्हा नवे पर्यटक आपल्या जिल्ह्यात येणे, पर्यटनामधून रोगजार उपलब्ध होणे, स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळणे या सर्वांसाठी सर्व घटकांनी एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत. हा वारसा स्थळे जगासमोर घेऊन जाण्याची मोठी संधी पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पर्यटन म्हटले की, केरळ, राजस्थान, हिमालच, सिक्कीम ही स्थळे आपल्या समोर येतात. त्या प्रमाणे यापुढे पर्यटन म्हटले की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटले की सातारा जिल्हा समोर आला पाहिजे, यासाठी प्रशासनासोबत सर्वांनी पर्यटन वाढीसाठी काम केले पाहिजे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले.
पर्यटन विभागाच्या आई योजनेंतर्गत नवीन व अनभिज्ञ पर्यटन स्थळांचा विकास, साहसी व इको-टुरिझम मधील संधी उपलब्ध करुन देणे, स्थानिक व पर्यटन क्षेत्रातील भागधारक यांच्यात समन्वय, पर्यटन, उद्योजकता, कौशल्य विकास व स्थानिक रोजगारासाठी शासकीय योजनांची माहिती व महिला बचत गट आधारित पर्यटन उपक्रमांना चालना या अनुषंगाने या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी ट्रेकर्स, गिर्यारोह, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पर्यटन मार्गदर्शक, होम स्टे हॉस्पिटॅलीटी सेवा देणार, ट्रॅव्हल ब्लॉगर, सोशल मीडिया मार्केटर्स, साहसी खेळ व इव्हेंट आयोजक, पर्यटन संस्था व स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, महिला उद्योजक, यवुक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













