शंभू महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी जाणार्‍या पुणे, सातारा जिल्ह्यातील मानाच्या कावडींचे फलटण येथे स्वागत

शंभू महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी जाणार्‍या पुणे, सातारा जिल्ह्यातील मानाच्या कावडींचे फलटण येथे स्वागत

फलटण, दि. ८ : शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी आज (मंगळवारी) सायंकाळी मुंगी घाटाच्या पायथ्याशी कोथळे गावात एकत्र येणार असून त्यापैकी पुणे व सातारा जिल्ह्यातील कावडींचे आज (मंगळवारी) सकाळी फलटण शहरात भक्तीमय वातावरणात, हर हर महादेवच्या जयघोषात आणि शिंग तुतार्‍या डफड्यांच्या निनादात भाविकांनी स्वागत केले.

       आ. सचिन पाटील, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे व कार्यकर्त्यांनी जिंती नाका फलटण येथे मानाच्या तेली भुत्याच्या कावडीचे त्यासोबत असणाऱ्या मानकऱ्यांचे स्वागत केले. कावडीचे दर्शन घेतले.

       तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सौ. दिपाली अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, महसूल मंडलाधिकारी शिलवंत चव्हाण, तलाठी सोमनाथ पंडित यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व भाविकांनी कावडीचे व त्यासोबत असणार्‍या मानकर्‍यांचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडी सोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुतार्‍या आणि हर हर महादेवच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.

        सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडी सोबत असलेले मानकरी काशिनाथ कावडे तसेच एखतपूर, खळद, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी वगैरे पंचक्रोशीतील मानाच्या कावडी व मानकर्‍यांचे भक्तिपूर्ण वातावरणात अनेकांनी स्वागत केले. त्यानंतर या सर्व कावडी आपापल्या नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने मुंगी घाटाकडे मार्गस्थ झाल्या. मुंगी घाटातून या सर्व कावडी उद्या बुधवार सकाळपर्यंत शिंगणापूर डोंगर पठारावर पोहोचतील आणि तेथून मानानुक्रमे शंभू महादेवाला जलाभिषेक करुन परततील.

       गुणवरे ता. फलटण येथील आढाव कुटुंबाच्या कावडीला वाटाड्याचा मान असून सर्वांत पुढे असलेल्या या कावडीमागून सर्व कावडी जातात तर तेल्या भुत्याच्या कावडीचा मान शेवटी असून या कावडीतील गंगाजलाने शंभू महादेवाला रात्री १२ वाजता जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता होईल.

     विशिष्ट प्रकारची वाद्ये आणि हर हर महादेवाचा जयघोषच कावडी मुंगी घाटातून नेण्याची प्रेरणा व शक्ती असल्याने त्याच्या निनादात आणि शंभू महादेवाच्या जयघोषात कावडी वर नेण्यात येतात त्यावेळी प्रचंड उन्हाचा तडाखा आणि मुंगी घाटाची उभी चढण या कावडी त्यांचे मानकरी आणि भक्त सहजपणाने चढून जाताना पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने घाटाच्या पायथ्याशी आणि पठारावर उपस्थित असतात.

      शिखर शिंगणापूरची यात्रा १२ दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभ शकुनाची गुढी उभारुन श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री १२ वाजता देवाचे लग्न लावले जाते. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. हा राजा जोड्यांसह (पायातील बूट) घोड्यावरुन शंभू महादेवाच्या दर्शनाला जातो अशी परंपरा आहे.

फोटो : १) तेल्या भुत्याच्या कावडीचे स्वागत करताना आ. सचिन पाटील व मान्यवर, २) तेल्या भुत्याच्या कावडीचे मानकरी काशिनाथ कावडे यांचे व कवडीचे स्वागत करताना तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सौ. दिपाली जाधव व इतर, ३) तेल्या भुत्याच्या कावडीचे फलटण शहरात स्वागत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें