धुळ्यात सराफाचे दीड कोटींचे सोने चोरीला; सीसीटीव्हीच्या आधारे संशयित ताब्यात, संपूर्ण मुद्देमाल हस्तगत.
प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.
धुळे: शहरातील द्वारकामाई लॉजमध्ये मुक्कामास असलेल्या जुनागड येथील सुवर्ण व्यावसायिक अश्विनभाई काछडीया यांचे तब्बल १ कोटी ५५ लाख रुपये किमतीचे आणि १ किलो ६१२ ग्रॅम वजनाचे सुवर्णदागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. काछडीया हे आपल्या रूममध्ये दागिन्यांची बॅग ठेवून बाहेर गेले असता ही घरफोडी झाली होती. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रे फिरवली. या तपासात मालेगाव रोड परिसरातील स्थानिक संशयित हितेश सुरेश सोनी याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व विविध डिझाईनचे सुवर्णदागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय ठाकूर तसेच पोलीस अंमलदार गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, रफीक पठाण, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, मनोज वाघुल, विजय शिरसाठ, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसुदखान पठाण आणि पंकज जोंधळे यांच्या पथकाने संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कारवाई पूर्ण केली. या गुन्ह्याचा पुढील कायदेशीर तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत.










