धुळ्यात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर अन्न विभागाचा बडगा; थेट बंदचे आदेश….
फूड सेफ्टीचा मोठा धक्का! ७ अन्न नमुने जप्त, आस्थापनेवर कारवाई..
प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे
धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मंगळवार (दि. २१ जुलै २०२६) रोजी विविध आस्थापनांवर धडक तपासणी मोहीम राबवून सात अन्न नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच शिंदखेडा येथील एक आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळल्याने ती तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
धुळे शहरातील फॉर एव्हर वेलनेस केमिस्ट (मधुर संकुल, दत्त मंदिर, देवपूर), गर्ग एंटरप्राइजेस (मालेगाव रोड) आणि हॉटेल सिल्व्हर स्पून (साक्री रोड) या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या ठिकाणांहून पनीर, रिफा सोयाबीन ऑइल, डेअरी मिल्क मिल्किनीज आणि डेअरी मिल्क फ्रूट अँड नट असे चार अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
याशिवाय एम.सी.एम. बिर्याणीवाला (करवंद नाका, शिरपूर), गीतांजली द हाऊस ऑफ बिर्याणी अँड थाळी (शहादा रोड, शिरपूर) आणि स्वामी समर्थ चायनीज सेंटर (मेन रोड, शिंदखेडा) येथे तपासणी करून चिकन तंदूर बिर्याणी, चिकन दम बिर्याणी आणि सोयाबीन चिली असे तीन अन्न नमुने घेण्यात आले.
तपासणीदरम्यान स्वामी समर्थ चायनीज सेंटर, शिंदखेडा हे आस्थापन वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित आस्थापनास नोटीस बजावून वैध अन्न परवाना प्राप्त होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, धुळे शहरातील मेन पोस्ट कार्यालयासमोरील तसेच अग्रसेन चौकातील फास्ट फूड आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्यात येणार असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन आणि विनापरवाना अन्न उत्पादन व विक्री सुरू असल्याचे आढळलेल्या एका आस्थापनेवर तात्काळ बंदीची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक
आयुक्त (अन्न) श्री. गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आनंद पवार, श्री. शशिकांत राणे, श्री. अरविंद राऊत आणि श्री. मंगेश भावसार यांनी केली.












