साक्री तालुक्यातील कासारे येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची
40 लिटर ताडी विक्री केंद्र व चार हॉटेल वर कारवाई.
प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.
साक्री तालुक्यातील कासारे बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २२ जुलै रोजी अचानक तपासणी मोहीम राबवली. सहाय्यक आयुक्त गो. वी. माहोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान ‘पेडकाई माता ताडी विक्री केंद्रा’ची पाहणी करण्यात आली. ताडीचा नमुना प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आला असून, सुमारे ४० लिटर ताडीचा साठा जागीच जप्त करून ग्रामपंचायतीच्या कचरा निर्मूलन केंद्रात नष्ट करण्यात आला.
यानंतर पथकाने ओम शिवशक्ती, वैष्णव रेस्टॉरंट, नंद रेस्टॉरंट आणि त्रिमूर्ती हॉटेल या चार आस्थापनांची तपासणी केली. या ठिकाणी खाद्यपदार्थ साठवण्यासाठी आणि ग्राहकांना देण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर होत असल्याचे आढळून आले. तसेच कोणत्याही आस्थापनाकडे अन्न व्यवसायाचा वैध परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे गंभीर उल्लंघन झाल्याने प्रशासनाने सर्व आस्थापना तात्काळ प्रभावाने सील केल्या आहेत. संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आनंद पवार, शशिकांत राणे आणि अन्न व औषध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या धडक मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.












