चाळीसगावातील स्वयंदीपच्या दिव्यांग भगिनींचा रक्षाबंधनाला समाजाला आरसा, राखी बांधणारे हात नसले, तरी स्वाभिमानाची ताकद आहे

चाळीसगावातील स्वयंदीपच्या दिव्यांग भगिनींचा रक्षाबंधनाला समाजाला आरसा, राखी बांधणारे हात नसले, तरी स्वाभिमानाची ताकद आहे

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
रक्षाबंधन म्हटलं की बहिणीच्या हाताने भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी आणि भावाने तिच्या रक्षणाची घेतलेली शपथ डोळ्यांसमोर येते. पण चाळीसगावातील स्वयंदीपच्या दिव्यांग भगिनींकडे पाहिलं की रक्षाबंधनाचा अर्थच बदलून जातो. कुणाच्या हातात राखी बांधण्याची ताकद नाही, कुणाला पायावर उभं राहता येत नाही, कुणाला दिसत नाही, कुणाला ऐकू येत नाही; मात्र परिस्थितीसमोर शरण जाण्याची त्यांची तयारी नाही. शरीराने काही क्षमता हिरावल्या असतील; पण स्वाभिमान, जिद्द आणि जगण्याची उर्मी कुणीही हिरावून घेतलेली नाही. मीनाक्षीताई निकम यांनी उभं केलेलं स्वयंदीप हे केवळ आश्रयाचं ठिकाण नाही, तर संघर्षातून स्वावलंबनाकडे जाणाऱ्या भगिनींचं जिवंत विद्यापीठ आहे. इथे राखी हाताने बांधली जाते, कधी पायानेही बांधली जाते; पण त्या राखीचा अर्थ शरीराच्या क्षमतेपेक्षा कितीतरी मोठा आहे. इथे भाऊ रक्षणाचं वचन देतो; पण या भगिनी त्याला परिस्थितीशी दोन हात करून जगण्याचा धडा देतात. कारण ज्यांच्याकडे अनेक गोष्टी नाहीत, त्या जर आयुष्याला आव्हान देत उभ्या राहत असतील आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे. ते मात्र छोट्याशा अडचणीसमोर खचत असतील, तर प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो. खरं दिव्यांगत्व शरीरात आहे की विचारांमध्ये? रक्षाबंधनाच्या या पर्वावर स्वयंदीपच्या भगिनी समाजाला हाच आरसा दाखवत आहेत. त्यांना सहानुभूतीची गरज नाही; त्यांना सन्मानाची गरज आहे. त्यांना मदतीची भीक नको; त्यांच्या हाताला काम हवं. त्यांना चार भिंतींचा आधार नको; स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्याची संधी हवी. रक्षाबंधनाची खरी भेट कोणती या रक्षाबंधनाला राखी बांधून घेणे पुरेसे नाही. या भगिनींच्या कर्तृत्वाला बाजारपेठ द्या, त्यांच्या हाताला काम द्या, त्यांच्या स्वावलंबनाला बळ द्या. एक संधी कदाचित एखाद्या भगिनीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हाताने राखी बांधली नाही तरी भावना कमी होत नाही; पायाने बांधलेली राखीही नातं घट्ट बांधते. डोळ्यांना दिसत नसलं तरी स्वप्नं दिसतात. आवाज नसला तरी संघर्ष बोलतो. दिव्यांगत्व शरीरात असतं; स्वाभिमानात नाही रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वावर स्वयंदीपच्या प्रत्येक दिव्यांग भगिनीला मानाचा मुजरा

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें