स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन; चाळीसगाव नगरपरिषदेत आगळावेगळा उपक्रम
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव नव्हे, तर परस्पर स्नेह, विश्वास आणि आपुलकी जपण्याचा दिवस. याच भावनेतून चाळीसगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम राबवित शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. चाळीसगाव नगरपरिषदेत आयोजित या विशेष उपक्रमात प्रतिभाताईंनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांच्या हातावर राखी बांधली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांनी आपला भाऊ मानून रक्षाबंधन साजरे केले. नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच महिला नगराध्यक्षांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत अशा आगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. प्रतिभाताईंनी आपुलकीने राखी बांधल्याने अनेक स्वच्छता कर्मचारी भावूक झाले. आपल्या कामाची आणि कष्टांची दखल घेत आपल्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान दिल्याबद्दल त्यांनी प्रतिभाताईंचे मनापासून आभार मानले. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही प्रतिभाताईंना बहिणीचे स्थान देत आपल्या परीने भेटवस्तू देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी निर्माण झालेले भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचे क्षण उपस्थितांसाठीही भावनिक ठरले. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने चाळीसगावच्या स्वच्छतेचा सन्मान”, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि आपुलकीचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम चाळीसगावकरांच्या निश्चितच स्मरणात राहणारा ठरला आहे.













