मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी संभाजी सेनेचा आंदोलनाचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संभाजी सेनेच्या वतीने आज चाळीसगाव येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी शिरसाठ यांच्या नेतृत्वा खाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, या पत्रकार परिषदेत लक्ष्मण शिरसाठ यांनी विविध मुद्यावर हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसीप्रमाणे सवलती मिळाव्यात. तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, वसतिगृह सुविधा, उच्च शिक्षणासाठी सहाय्य व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच वयोमर्यादेत सवलत देण्यात यावी, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पूर्वी दाखल झालेले सर्व गुन्हे घेण्यात यावेत, सारथी संस्थेला भरोसेमंद व पुरेसा निधी देऊन किमान पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला लोकसंख्येच्या आधारावर किमान दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, तसेच तत्कालीन ईडब्ल्यूएसमधील उर्वरित प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी. आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या पात्रतेनुसार व महिलांच्या सोयीनुसार नोकरी देण्यात यावी, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि निर्माण झालेली तेढ संपुष्टात यावी, यासाठी संवादाची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक तसेच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या जुन्या मंडळींना एकत्र घेऊन हे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र आला होता. त्यानंतर विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने झाली. या आंदोलनातून मराठा समाजातील विविध घटक एकत्र आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
संघटनेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी करण्यात आलेल्या कामांचाही उल्लेख केला आहे. विशेष अधिवेशनात ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी कायदा २०२४’ मंजूर करून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के कायदेशीर आरक्षण देण्यात आल्याचे देखील नमूद करण्यात आले. मराठा समाजातील पात्र उमेदवारांना संधी मिळावी, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध व्हावे तसेच एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती आदी परीक्षांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद वाढू नये, तर सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम राहावा, यासाठी सर्वांनी संयमाने आणि संवादातून मार्ग काढावा, असे आवाहन संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला संभाजी सेनेचे पधादिकारी तसेच
मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












