साखरवाडी-बडेखान रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला; वाहनधारकांचे मणके झाले खिळखिळे
फलटण प्रतिनिधी
फलटण दि २ जुलै २०२६
लोणंद-फलटण पालखी महामार्गाला जोडणारा साखरवाडी–बडेखान हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही आणि त्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे.
साखरवाडी ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ असून या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच शाळा आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा वाहनांचा तोल जात असून किरकोळ अपघात वारंवार घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने वाहनांना मोठ्या प्रमाणावर धक्के बसत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांना कमरेचा व मणक्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसात या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी तात्पुरती दुरुस्ती करून नंतर कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेकडे वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून, संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.













