खंडाळा तालुक्याचे सुपुत्र विशाल गिरी यांची ‘केंद्रप्रमुख’ पदी निवड
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
खंडाळा (प्रतिनिधी): सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच ‘केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ या परीक्षेतील गुणवत्ताधारकांना केंद्रप्रमुख पदी नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये खंडाळा तालुक्यात कार्यरत असणारे आणि अत्यंत उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित असलेले विशाल गिरी यांची वाई तालुक्यातील वयगाव केंद्रात केंद्रप्रमुखपदी (केंद्र समन्वयक) नियुक्ती झाली . त्यांच्या या यशाबद्दल समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रसाद ढगे यांनी अभिनंदन केले. खंडाळा व वाई तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात पाटण सारख्या दुर्गम भागातून करताना आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवला. बदलीनंतर खंडाळा तालुक्यातील पाडळी येथे त्यांच्या शैक्षणिक आणि रचनात्मक कार्याला एक वेगळीच उंची मिळाली. त्यांनी प्राथमिक शिक्षक या पदावर १६ वर्षे अविरत आणि निष्ठापूर्वक सेवा बजावली.
अलीकडेच त्यांना खंडाळा तालुका पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या या निवडीमुळे खंडाळा तालुक्यातील शिक्षक वर्ग, पाडळी शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, वेळेवाडी,बोरी,पाडळी ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.













