एव्हीबी माझा |
फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसह चार महापुरुषांचे पुतळे उभारणार; नगर परिषदेच्या विशेष सभेत महत्त्वपूर्ण निर्णय
फलटण प्रतिनिधी |
फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांच्या उभारणीला फलटण नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
याच सभेत आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी दर्शनबारी, हिरकणी कक्ष, स्वच्छता व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांसह १९ विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच शहर विकासाशी संबंधित एकूण २१ विषयांना सभेने सर्वानुमते मान्यता दिली.
सभेत सगुणामाता नगर येथील ‘रामराजे उद्यान’चे नामांतर करून ‘संत सगुणामाता उद्यान’ असे नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. शहरातील अतिक्रमण हटविणे, मोकळ्या खासगी भूखंडांची स्वच्छता, पाणीपुरवठा सुधारणा, नवीन बोअरवेल, हातपंप दुरुस्ती आणि गोळीबार मैदान येथे पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यासह विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महापुरुषांच्या स्मृती जपण्याबरोबरच शहराच्या विकास आणि मूलभूत सुविधांना चालना देणारे अनेक निर्णय या विशेष सभेत घेण्यात आल्याने आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.













