शेतात काम करत असतांना बिबट्याचा हल्ला….
काठी, धाडस आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्याचा थरारक सुटका…
वनविभागाच्या निष्क्रियतेवर संताप….
शेतात काम करत असताना आदिवासी शेतकरी भगवान तुकाराम भेवरे (वय ६५) यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला चढवल्याची घटना घडली. पिंपळनेर शहरापासून काही किलोमीटर अंतवनविभागाच्या निष्क्रियतेवर संताप….
रावरील बिलदर परिसरात गुरुवारी सकाळी थरारक घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भगवान भेवरे हे आपल्या शेतातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी लवणाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी झाडाझुडपांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्यांच्यावर झडप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही काळ जीव मुठीत धरून संघर्ष सुरू झाला.
मात्र प्रसंगावधान राखत भगवान भेवरे यांनी हातातील काठीने बिबट्याचा प्रतिकार केला. तसेच त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने जवळपास काम करणारे शेतकरी घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी दगड आणि काठ्यांच्या सहाय्याने बिबट्याला पिटाळून लावले. वाढता प्रतिकार पाहून बिबट्याने डोंगराच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे भगवान भेवरे यांची थरारक सुटका झाली.
हल्ल्यात जखमी झालेल्या भगवान भेवरे यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने पिंपळनेर शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या परिसरात बिबट्याचा वारंवार वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी अनेक वेळा वनविभागाला दिली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. योग्य उपाययोजना न केल्यामुळे आज एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव धोक्यात आल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
“आम्ही शेतात काम करायचे की जीव वाचवायचा? वारंवार सूचना देऊनही वनविभाग झोपेत का?” असा संतप्त सवाल आदिवासी शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बिलदर व परिसरात बिबट्याचा वाढता संचार लक्षात घेता वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.











