संस्थेने सभासद करून न घेतल्यास कायदेशीर मार्गाने लढा उभारणार रावि बचाव पदाधिकाऱ्यांचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव : –
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत कुठलीही सभासद नोंदणी झालेली नसल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप रावि बचाव समितीचे संयोजक अॅड. राजेंद्र सोनवणे यांनी काल पत्रकार परिषद घेत केला.
मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला, संस्थेच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. अॅड. सोनवणे म्हणाले की, एका संचालकाच्या भावाने मला फोन करून ‘तुम्हाला नाही, पण तुमच्या पत्नीला सभासद करून घेऊ’ असा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी त्यास स्पष्ट नकार दिला. अशाच प्रकारचे फोन त्यांनी अनेक नागरिकांना केले, यावरून सभासद नोंदणी झाली असल्याचे अप्रत्यक्षपणे सिद्ध होते. गरज भासल्यास या प्रकरणी अॅफिडेव्हिट सादर करण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनायक चव्हाण यांनी नोंदणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पण ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचा दावा सोनवणे यांनी केला. सभासद नोंदणीची प्रक्रिया प्रत्यक्षात प्रोसिडिंगमध्ये झाली असून, रावि बचाव समितीची बैठक झाल्यानंतरच अध्यक्षांनी यावर यूटर्न घेत केवळ चर्चा झाली होती, असा कांगावा केल्याचे त्यांनी सांगितले. ही संस्था बहुजनांची असून ती एका विशिष्ट कुटुंबाच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आणि त्यातून लोकचळवळीचे स्वरूप आले आहे, असेही सोनवणे यांनी नमूद केले. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून विहीत नमुन्यातील सभासद अर्ज सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. अनेक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने हे अर्ज भरून दिले असून ते रितसर संस्थेकडे सादर करण्यात येणार आहेत. या अर्जदारांना सभासद करून घ्यावे, तसेच संस्थेचे बँक व्यवहार व आर्थिक तपशील सार्वजनिक करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. संस्थेने याबाबत निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८० अन्वये डीडीआर कडे अशी मागणी सर्वपक्षीय समिती मार्फत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागण्यात येईल आणि वेळ पडल्यास न्यायालयातही जाण्याचा इशारा अॅड. सोनवणे यांनी दिला. या पत्रकार परिषदेला के. बी. साळुंखे, अॅड. रोहिदास पाटील, नितीन पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत देशमुख, राहुल पाटील, किसनराव जोर्वेकर, आर. डी. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त करत संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.












