पसरणीत वाई तालुक्यातील पहिल्या १८ के.व्ही. सोलर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
पसरणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे भाग्य लाभले – सौ. हेमलता अशोकराव गायकवाड, सरपंच
वाई तालुक्यात विकासकामांमध्ये अग्रेसर असलेल्या पसरणी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामपंचायतीवर पाणीपुरवठा योजनेच्या विजेच्या बिलांमुळे येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी १८ के.व्ही. क्षमतेचा सोलर विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीवर येणारा आर्थिक बोजा लक्षणीयरीत्या कमी होणार असून, भविष्यात प्रकल्पाची क्षमता वाढवून वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे.
युवा नेते स्वप्नील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामपंचायतीला दरमहा सुमारे ७०-८० हजार रुपयांचे वीज बिल येत होते. या सोलर प्रकल्पामुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. गावात रस्ते, पाणीपुरवठा योजना, बंदिस्त गटारे, शालेय सुविधा यांसारखी अनेक ठोस विकासकामे या पंचवर्षीय योजनेत पूर्ण झाली आहेत. मात्र, भविष्याच्या दृष्टिकोनातून हा सोलर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प जल जीवन मिशन अंतर्गत नसून, १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आला आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य नियोजनाद्वारे निधीचा कार्यक्षम वापर करता येऊ शकतो, हे पसरणी गावाने दाखवून दिले आहे. या कामाबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन पसरणी गावच्या सरपंच सौ. हेमलता अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वाई सुतगिरणीचे उपाध्यक्ष श्री. धर्माजी शिर्के (बापू), श्री. बाजीराव नाना महांगडे (कारभारी), श्री. आनंदराव पाटील, युवा नेते स्वप्नील गायकवाड, श्री. शिवाजी अण्णा येवले, श्री. संपत महांगडे, श्री. दीपक महांगडे, श्री. राजेंद्र येवले, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. अमोल आबा महांगडे, श्री. शशिकांत महांगडे, श्री. भानुदास नेवसे, श्री. अशोक शिर्के, श्री. प्रकाश आप्पा येवले, श्री. संजय कांबळे, श्री. दीपक नाना शिर्के, श्री. भगवान महांगडे, श्री. विलास महांगडे, श्री. दत्तात्रेय महांगडे (बापू), श्री. भानुदास शिर्के, श्री. माऊली येवले, श्री. दादा येवले, श्री. शांताराम महांगडे, श्री. मधुकर साबळे, श्री. उमेश येवले यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पसरणीच्या वतीने उपसरपंच श्री. बद्रीनाथ महांगडे, माजी उपसरपंच श्री. विशाल शिर्के, श्री. आनंदा येवले (दादा), सौ. अनिता महांगडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले. प्रकल्प उभारणीसाठी ग्रामसेवक श्री. रामदास निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या ग्रामसेवक संघटनेच्या वाई तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकल्पाच्या उभारणीप्रक्रियेत श्री. मनोज मांढरे, श्री. उत्तम गाढवे आणि श्री. चंद्रकांत महांगडे यांनी मोलाचे सहकार्य केले.












