माहुलीचा ११० वर्षांचा पूल धोक्यात: प्रशासनाचा निष्काळजीपणा?
उमेश लांडगे
सातारा, दि. १६ जून २०२५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला. चार जणांचा मृत्यू झाला असून, २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली. याचवेळी, सातारा-कोरेगाव रस्त्यावरील कृष्णा नदीवरील ११० वर्षे जुन्या माहुली पुलाच्या धोकादायक अवस्थेकडे लक्ष वेधले जात आहे. बांधकामाची मुदत संपून १० वर्षे झाली, तरी प्रशासन झोपले आहे.
इंद्रायणी नदीवर झालेली दुर्घटना म्हणजेच निष्काळजीपणाचा बळी.
मावळ येथील ३० वर्षे जुन्या पुलाची दुरवस्था स्थानिकांना माहीत होती. नवीन पूल बांधण्यासाठी ८ कोटी रुपये मंजूर झाले, पण काम सुरू झाले नाही. रविवारी पूल कोसळला आणि अनेकांचे जीव धोक्यात आले. एनडीआरएफ आणि स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले, तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
माहुली येथील ब्रिटिशकालीन पुलाची मुदत २०१५ मध्येच संपली. माऊलीचा पूल म्हणजे दुर्घटनेची टांगती तलवार. असेच सामान्यांना वाटत आहे.
नवीन पूल बांधण्याचे काम तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे; फक्त एकच पिलर उभा आहे. या गतीने कामास ५-१० वर्षे लागतील. जुना पूल धोकादायक असून, दररोज हजारो नागरिक तो वापरतात. प्रशासनाला याची चिंता आहे का?
२०१६ मध्ये महाड येथील सावित्री पूल कोसळून ४२ जण मृत्यूमुखी पडले. तरीही प्रशासनाने जीर्ण पुलांची तपासणी गांभीर्याने घेतली नाही. मावळ दुर्घटनेने हाच प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे.
माहुली पूल हा लाखो नागरिकांचा जीवनमार्ग आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मावळमध्ये जीव गमावले, आता माहुलीची पाळी आहे का? नवीन पूल तातडीने पूर्ण करावा आणि जुन्या पुलाची तपासणी करावी, अशी मागणी आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा आणखी एक दुर्घटना अटळ आहे.










