माऊलींच्या पालखी सोहळ्यात समन्वयाने काम करावे-
गटविकास अधिकारी अनिल वाघमारे
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
लोणंद:”वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देणे हे आपले कर्तव्य असून,माऊलींचा पालखी सोहळा उत्तम रीतीने यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,”अशा सूचना तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी दिल्या. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दि .१५ रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करित आहे.जिल्ह्यामध्ये माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत आणि लोणंद शहरात माऊलींचा मुक्काम असल्यामुळे तालुका पंचायत समितीच्या किसनवीर स्मारक सभागृहात नियोजनासाठी आढावा बैठक पार पडली आहे.यावेळी जावलीचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश गायकवाड, गटशिक्षण अधिकारी प्रसाद ढगे,एकात्मिक सेवा योजना प्रकल्प अधिकारी वीणा काळे,विस्तार अधिकारी सनील बोडरे,तालुका अधिकारी डॉ. पी. सी.बुलाख अतुल गायकवाड यांसह विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
गुरुवारी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा तालुक्यात लोणंदला मुक्कामी आहे.त्यामुळे पाणी पुरवठा,आरोग्य,स्वच्छता,शिक्षण, आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी वाघमारे म्हणाले,गत वेळी वारकरी आणि विश्वस्तांची प्रशासनाच्या काम काजाबाबत कोणतीही तक्रार नाही,परंतु सुविधांचा तुटवडा भासू नये.यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पाहणी करावी.येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात,जेणेकरून त्यावर तात्काळ उपाय योजना करता येतील.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजार पसरू नयेत म्हणून पाणी शुद्धीकरणासाठी आणि स्वच्छतेसाठी टी.सी.एल.पावडरचा वापर करून योग्य ती खबरदारी घेत विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
पाणी टँकर भरल्यानंतर पाण्याचा अपव्यय आणि त्या ठिकाणी चिखल होणार नाही याची दक्षता घ्यावी.चालक व संबंधित कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत.वारकऱ्यांना सेवा-सुविधा देण्याचे पवित्र काम आपल्याला करायचे आहे.सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोणतीही हलगर्जी न करता जबाबदारीने कर्तव्य बजवावे,असे ही गटविकास अधिकारी अनिल वाघमारे म्हणाले.













