जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्याच्या मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे मुंबईत तीव्र आंदोलन
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव , :-
: रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गुरुवारी सायन येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, जतन व ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी विभागाकडून नाकारण्यात आल्याने महाराष्ट्रातील दुर्गसेवक आणि हिंदूप्रिय नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता सायन येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दुर्गसेवक मुंबईत दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी देण्याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत विषयावर सकारात्मक भूमिका घेऊन कायदेशीर चौकटीत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.













