विजेच्या भीषण धक्क्याने खामगाव येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू
साखरवाडी प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घराबाहेरील वायरमधील विजेचा तीव्र शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण शिंदे कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
एकमेकांना वाचवताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमध्ये अचानक वीजप्रवाह उतरला. प्रथम घरप्रमुख किसन पिसुरड्या शिंदे (वय ४८) यांना या वायरचा जोरदार झटका बसला. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६) या पुढे सरसावल्या, मात्र त्यांनाही विजेने जखडले. आई-वडिलांना वाचवण्यासाठी धावलेला मुलगा सचिन (वय २६) आणि मुलगी आरती (वय २२) हे दोन्ही बहीण-भाऊ देखील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. अवघ्या काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
सखोल तपास सुरू
घराबाहेरील विद्युत वायरमध्ये अचानक वीजप्रवाह कसा आला आणि या भीषण अपघातामागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. एकाच घरातील चार व्यक्तींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.













