एव्हीबी माझासाठी बातमी
फलटण फेस्टिव्हलमध्ये ग्रुप डान्स स्पर्धेची रंगत; साताऱ्याच्या आकाश कला केंद्राचा प्रथम क्रमांक!
फलटणच्या सांस्कृतिक मंचावर विविध शाळा व डान्स अकॅडमींच्या कलाकारांचा नृत्याविष्कार; अॅड. मधुबाला भोसले यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
फलटण | एव्हीबी माझा
श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या दुसऱ्या दिवशी आयोजित ग्रुप डान्स स्पर्धेला फलटणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सातारा येथील आकाश कला केंद्राने उत्कृष्ट नृत्य सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. फलटणच्या नृत्य कला अकॅडमीने द्वितीय, तर अल्फा ग्रुप, फलटणने तृतीय क्रमांक मिळवला.
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नगरी, यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, तेजसिंह भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत विविध शाळा आणि डान्स अकॅडमींच्या कलाकारांनी उत्साहपूर्ण नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा, निशिताज डान्स अकॅडमी, ओरा गर्ल्स ग्रुप, डिम्स फ्लाय डान्स, व्हिक्ट्री डान्स अकॅडमी, आकाश कला केंद्र सातारा, नृत्य कला अकॅडमी फलटण आणि गणेश ग्रुपसह विविध संघांनी सहभाग नोंदवला.
पुणे येथील सांस्कृतिक कलाकार व नृत्यदिग्दर्शक प्रा. गणेश उपाध्याय आणि बारामती येथील कलाकार व दिग्दर्शक सनी पवार यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
स्पर्धेतील विजेते आणि सहभागी कलाकारांचा स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख अॅड. सौ. मधुबाला भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, नगरसेविका सौ. रुपाली सस्ते, स्वयंसिद्धा कल्चरल ग्रुपच्या संचालिका सौ. राजस भोईटे, सौ. अलका बेडकीहाळ आणि सौ. स्वाती फुले उपस्थित होत्या.
विविध नृत्यप्रकार, कलाकारांचा उत्साह आणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती यामुळे ग्रुप डान्स स्पर्धेने फलटण फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत विशेष रंगत आणली.
— संपादक विजय भिसे
एव्हीबी माझा












