शिक्षण विभागाला धक्का! पावसात दिवसभर उपोषण, खासदार निलेश लंके पोहोचले अन् तातडीने दिले चौकशीचे आदेश

शिक्षण विभागाला धक्का! पावसात दिवसभर उपोषण, खासदार निलेश लंके पोहोचले अन् तातडीने दिले चौकशीचे आदेश

शरद दुधाळ पाथर्डी

साकेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थिनी प्रतिज्ञा लक्ष्मण डांगे हिच्यावर झालेल्या कथित शैक्षणिक अन्यायाच्या निषेधार्थ तिचे वडील तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आश्रू डांगे आणि प्रतिज्ञा डांगे यांनी मंगळवारी (दि. ७ जुलै) जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही पिता-पुत्रीने न्यायासाठी ठामपणे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.या आंदोलनाची गंभीर दखल घेत अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट देऊन लक्ष्मण डांगे व प्रतिज्ञा डांगे यांची सविस्तर बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना तातडीने उपोषणस्थळी बोलावून संबंधित प्रकरणाचा फेर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. विद्यार्थिनीवर कोणताही अन्याय होणार नाही, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

शिक्षण विभागाने दिलेल्या लेखी पत्रानुसार, १० जुलै २०२६ रोजी चौकशी अधिकारी संबंधित शाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविणार असून, चौकशी प्रक्रियेला सर्वांनी सहकार्य करावे, असे नमूद करण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.खासदार निलेश लंके यांच्या आश्वासनानंतर आणि फेर चौकशीचे लेखी आदेश मिळाल्यानंतर संध्याकाळी सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मण डांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतले. मात्र, विद्यार्थिनीला पूर्ण न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठा महासंघाचे पाथर्डी उपाध्यक्ष रामदास बर्डे उपस्थित होते. दिवसभर पावसात सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता फेर चौकशी अहवाल आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें