जलतरण तलावातील वादानंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल;
चाळीसगाव प्रतिनिधी :-
शहरातील अण्णाभाऊ साठे जलतरण तलावात पोहत असताना झालेल्या वादातून दोन गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारींवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसनराव यशवंत जोर्वेकर (रा. साईधाम, संजय गृह निर्माण संस्था, भडगाव रोड, चाळीसगाव) व श्याम उर्फ अप्पणा नारायण गवळी (रा. अभिनव शाळेसमोर, भडगाव रोड, चाळीसगाव) यांच्यात ७ जून रोजी सायंकाळी जलतरण तलावात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या.
जोर्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत, श्याम गवळी यांनी तलावात ढकलून बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर श्याम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीत, ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्याच्या रागातून जोर्वेकर व त्यांच्या साथीदारांनी तलावात ढकलून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच घरी परतत असताना रस्ता अडवून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमान्वये दोन्ही बाजूंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्याम उर्फ अप्पणा गवळी यांच्या फिर्यादीवरून किसनराव जोर्वेकर यांच्यासह इतर दोघांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













