सातारा पोलिसांची मोठी कारवाई : सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ७ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

सातारा पोलिसांची मोठी कारवाई : सराईत गुन्हेगारांच्या टोळीला ७ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

 

सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी परिसरात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून सात महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.

 

हद्दपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये राज श्रीमंत वैराट (वय २३), अजय शंकर बागल (वय २२), आयुष बाबु भोसले (वय १८) आणि शुभम भैरवनाथ मोहिते (वय २०) यांचा समावेश आहे. हे सर्वजण माजगावकरमाळ, शाहूपुरी, सातारा येथील रहिवासी आहेत.

 

संबंधित आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी, विनयभंग, बेकायदेशीर दारू विक्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे यांनी सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली.

 

पोलीस प्रशासनाने वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही संबंधित आरोपींच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यांच्या दहशतीमुळे शाहूपुरी व परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

 

पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण निखील पिंगळे यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर सदर टोळीला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सात महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला.

 

सातारा जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी काळात सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीएसारख्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलीस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें