पुरंदर प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्याची पत्रकाराशी उद्धट वर्तणूक; १५ ऑगस्टला आमरण इशारा!
‘साप्ताहिक सातारा सम्राट’चे जिल्हा प्रतिनिधी नितीन जगताप यांची प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार
कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाचा एल्गार
प्रतिनिधी शिवाजी भोसले
पुरंदर-सासवड उपविभागीय (प्रांत) कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या पत्रकाराशी अत्यंत उद्धट, अरेरावीचे व अपमानजनक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कार्यालयातील संबंधित कर्मचारी बापू सटाले यांच्यावर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिना दिवशी) प्रांत कार्यालयासमोर ‘आमरण उपोषण’ करण्याचा इशारा ‘साप्ताहिक सातारा सम्राट’चे जिल्हा प्रतिनिधी नितीन बाळासो जगताप यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार नितीन जगताप हे १० ऑगस्ट रोजी स्वतःच्या मालकी जमिनीच्या चालू/बंद असलेल्या केसच्या सद्यस्थितीबाबत (Status) माहिती घेण्यासाठी पुरंदर-सासवड प्रांत कार्यालयात गेले होते. त्यांनी येथील कर्मचारी बापू सटाले यांच्याकडे अत्यंत नम्रतेने माहिती विचारली. मात्र, बापू सटाले यांनी शांततेने विचारपूस न करता जगताप यांच्याशी असभ्य व अरेरावीची भाषा वापरली.
जेव्हा जगताप यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा संदर्भ देत “मी एक पत्रकार आहे” अशी ओळख करून दिली, तेव्हा सटाले यांनी सर्व मर्यादा ओलांडत, “तू कोणताही पत्रकार असो, मी कोणत्याही पत्रकाराला किंमत देत नाही!” असे अपमानजनक शब्द वापरून पत्रकार पेशाचा तीव्र अवमान केला.
शासकीय कार्यालयात माहिती मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकाशी व पत्रकाराशी अशा प्रकारे बेजबाबदार आणि ऊर्मट वर्तन करणे हे शासकीय सेवा नियमांचा उघड भंग करणारे आहे. शासकीय कर्मचाऱ्याच्या या मनमानी कारभारामुळे पत्रकार वर्गात व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
या घडलेल्या गंभीर प्रकारानंतर पत्रकार नितीन जगताप यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (प्रांत अधिकारी) लेखी तक्रार नोंदवली आहे. उद्धट वर्तन करणाऱ्या कर्मचारी बापू सटाले यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सदर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, तर येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुरंदर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या उपोषणादरम्यान होणाऱ्या सर्व शारीरिक, मानसिक व प्रशासकीय परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रांत कार्यालयाची राहील, असेही त्यांनी सांगितले आहे.













