फलटणमधील गुन्हेगारी टोळीवर सातारा पोलिसांचा दणका; १० जण सहा महिन्यांसाठी हद्दपार


चोरी, जबरी चोरीसह खंडणी, दुखापत आणि बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल
फलटण | प्रतिनिधी
फलटण शहर परिसरात गुन्हेगारीचा धुमाकूळ घालणाऱ्या १० जणांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी अखेर हद्दपारीची कारवाई करत मोठा दणका दिला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये या टोळीला तब्बल सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील निश्चित तालुक्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या या टोळीवर पोलिसांकडून वेळोवेळी अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी संबंधित टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे सादर केला.
या प्रस्तावाची चौकशी विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांनी केली. चौकशीदरम्यान टोळीतील सदस्यांविरुद्ध दाखल असलेले गुन्हे, त्यांच्यावर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया तसेच त्यांच्यामुळे निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न याबाबतचा पुरावा सादर करण्यात आला.
चोरीपासून अग्निशस्त्रापर्यंत गंभीर गुन्हे
या टोळीतील सदस्यांवर चोरी करणे, जबरी चोरीसह खंडणी मागणे, दुखापत पोहोचवणे, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
वेळोवेळी अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने या टोळीवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता निर्माण झाली होती. फलटण तालुका परिसरातील नागरिकांकडूनही अशा गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी होत होती.
सहा महिन्यांसाठी मोठ्या क्षेत्रातून हद्दपार
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या समोर टोळी प्रमुख व सदस्यांची सुनावणी झाली. सुनावणीनंतर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या परिसरातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला.
हद्दपार करण्यात आलेले १० जण
१. तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे, वय २४, रा. झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण — टोळी प्रमुख.
२. साहिल रवि तारे, वय २४, रा. दत्तनगर, फलटण.
३. वैभव बाळासो सस्ते, वय २५, रा. सस्तेवाडी, फलटण.
४. रोहन ऊर्फ यल्या नवीन काकडे, वय २४, रा. मंगळवार पेठ, फलटण.
५. विनायक बाळासो जाधव, वय २०, रा. ठाकूरकी, फलटण.
६. राज ऊर्फ राजू राम बोके, वय ३८, रा. मंगळवार पेठ, फलटण.
७. विजय दत्तू ननवरे, वय २७, रा. झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण.
८. गायत्री ऊर्फ प्राची नितीन गाडे, वय १८, रा. कोंडवे, ता. सातारा.
९. सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे, वय ३१, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे.
१०. राहुल रामचंद्र जगताप, वय २६, रा. कसबा पेठ, पवार गल्ली, फलटण.
सराईत गुन्हेगारांवर आता ‘कडक’ कारवाई
सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी काळात सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए यांसारख्या कठोर कायदेशीर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे फलटण शहर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांच्या पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका
या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सरकार पक्षाच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष नाळे, बापुराव धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र टीके, मुकेश घोरपडे आणि अतुल बडे यांनी हद्दपार प्राधिकरणासमोर योग्य पुरावे सादर केले.
या कारवाईमुळे फलटण परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होण्यास मदत होणार असून, आगामी काळातही अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सातारा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एव्हीबी माझा | सातारा












