स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ९ गुन्हे उघड
२ जबरी चोरी, ५ घरफोडी, २ चोरीचे गुन्हे उघडकीस; सुमारे १४ लाखांचे सोन्याचे दागिने, दुचाकी व हत्यार जप्त
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. सराईत गुन्हेगार चाँद उर्फ सुरज जालिंदर पवार (रा. काळज, ता. फलटण, जि. सातारा) याला शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. या कारवाईत ९ तोळे ६ ग्रॅम ८४० मिली वजनाचे सोन्याचे दागिने, चालू बाजारभावानुसार सुमारे १४ लाख रुपये किमतीचे, गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार, असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे दरोडे, जबरी चोरी, घरफोडी यांसह इतर मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार घोडके यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती केली.
खास बातमीदाराच्या माहितीवरून सापळा
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत सराईत गुन्हेगार चाँद उर्फ सुरज जालिंदर पवार हा आपल्या साथीदारांसह मानेवाडी गावच्या हद्दीतील एका शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तपास पथकाला संबंधित ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार १८ जून २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांच्या पथकाने काळज-मानेवाडी परिसरात जाऊन वेशांतर करून सापळा रचला. आरोपी नेमका कोठे लपून बसला आहे, याची माहिती घेतल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, पोलिसांची चाहूल लागताच चाँद उर्फ सुरज पवार याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तपास पथकातील पोलिसांनी जिवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
शिरवळच्या जबरी चोरीसह आठ गुन्ह्यांची उकल
स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी असलेल्या शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२३/२०२६ मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यात चाँद पवार व त्याचे साथीदार सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान चाँद उर्फ सुरज पवार याने सातारा जिल्ह्यासह इतर ठिकाणी चोरी, घरफोडी, जबरी चोरी तसेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणी केलेल्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणते ९ गुन्हे उघडकीस?
१) शिरवळ पोलीस ठाणे – गु.र.नं. १२३/२०२६ – BNS कलम ३०९(६), ३३१(६), ३५१(२), ३५२, ३१७(२), २३८, ३(५) – जबरी चोरी
२) वडूज पोलीस ठाणे – गु.र.नं. ५८/२०२६ – BNS कलम ३०९(४) – जबरी चोरी
३) शिरवळ पोलीस ठाणे – गु.र.नं. २१०/२०२० – IPC कलम ४५४, ३८० – घरफोडी
४) शिरवळ पोलीस ठाणे – गु.र.नं. १३०/२०२६ – BNS कलम ३०५(अ), ३३१(४) – घरफोडी
५) फलटण ग्रामीण पोलीस ठाणे – गु.र.नं. ७९४/२०२५ – BNS कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) – घरफोडी
६) खंडाळा पोलीस ठाणे – गु.र.नं. २९/२०२६ – BNS कलम ३०५(अ), ३३१(३) – घरफोडी
७) लोणंद पोलीस ठाणे – गु.र.नं. २१७/२०२६ – BNS कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) – घरफोडी
८) फलटण ग्रामीण पोलीस ठाणे – गु.र.नं. २७८/२०२६ – BNS कलम ३०५(अ) – चोरी
९) बारामती शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. १६५/२०२६ – BNS कलम ३०३(२) – मोटारसायकल चोरी
१४ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ९ तोळे ६ ग्रॅम ८४० मिली वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या सोन्याची चालू बाजारभावानुसार अंदाजे किंमत १४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि गुन्हा करताना वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे.
अशा प्रकारे या कारवाईत एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोनारांचाही तपास सुरू
गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री अथवा त्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने काही सोनार निष्पन्न झाले असून, त्यांना अटक करण्याची तजवीज सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सहायक फौजदार राजू मुलाणी, पोलीस हवालदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, अमोल माने, मुनिर मुल्ला, अजित कर्णे, जयवंत खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, अमीत झेंडे, प्रमोद सावंत, हणमंत भोसले, नवनाथ कदम, राजू कांबळे, मनोज जाधव, अमीत माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्नील दौंड, महेश निर्मळ, इरफान मुलाणी, संकेत निकम, शकुंतला सणस, अधिका वीर, निकिता जाधव तसेच चालक अमृत करपे, विजय निकम आणि आनंदा भोये यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
एव्हीबी माझा | सातारा












