रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल; फलटणच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात धडाधड निर्णय!
सातारा, दि. १२ ऑगस्ट : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राची थेट दखल घेत मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार फलटण शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. बैठकीचा सविस्तर अहवाल थेट मुख्यमंत्री सचिवालयाला सादर केला जाणार असल्याने फलटणच्या प्रश्नांना आता शासनस्तरावर वेग मिळण्याची शक्यता आहे.
या बैठकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न आक्रमकपणे मांडत अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचा आढावा घेतला. महावितरण, रस्ते, एमआयडीसी, रेल्वे स्टेशन, पोलीस वसाहत, बाणगंगा नदी, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय आणि शहर हद्दवाढ अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
बैठकीला आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
महावितरणच्या प्रश्नांवर रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा आक्रमक पवित्रा
बैठकीत महावितरणच्या कारभारावर सविस्तर चर्चा झाली. शहरासह पालखी मार्गावरील धोकादायक पोल व डीपी हलविण्याची मागणी करण्यात आली. शहर व तालुक्यात ११ केव्हीचे डीपी बसविण्याचे काम सुरू असून, त्यामुळे डीपी चोरीला आळा बसेल, अशी माहिती देण्यात आली.
फलटण शहरासाठी मंजूर असलेले सब-स्टेशन तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार सचिन पाटील यांनी दिल्या. ग्रामीण भागातील शेती फिडरवर संध्याकाळी ६ ते रात्री १० या काळात वीज नसल्याच्या तक्रारीवरही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
जॅक्सन कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी तीन नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. डीपी बदलण्यासाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
नाईकबोमवाडी एमआयडीसीसाठी नवीन सब-स्टेशन
नाईकबोमवाडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर झाली असून आगामी काळात या परिसरात नवीन कंपन्या येणार आहेत. त्यामुळे उद्योगांना पुरेशी वीज उपलब्ध व्हावी यासाठी नवीन सब-स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले.
फलटण रेल्वे स्टेशनकडे जाणारे सर्व रस्ते तातडीने करण्याचा विषयही बैठकीत मांडण्यात आला. हे रस्ते डिसेंबरच्या बजेटमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. फलटण शहर पोलीस स्टेशनची वसाहत सहा महिन्यांपासून तयार असूनही प्रलंबित असल्याचा मुद्दाही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
बाणगंगा नदीला ‘अमृत २’ची संजीवनी
फलटणच्या ऐतिहासिक बाणगंगा नदीचा समावेश ‘अमृत २’ योजनेत करण्यात आला आहे. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मुधोजी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागापासून सस्तेवाडीपर्यंत नदीचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे.
नवीन न्यायालयासाठी पुढील कार्यवाही
फलटण तालुक्यासाठी नवीन न्यायालय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे. स्थळ पाहणी करून तसेच जिल्हा न्यायालयाला विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
झिरपवाडीत सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय
फलटणच्या आरोग्य सुविधांमध्ये भर घालण्यासाठी झिरपवाडी येथील जुनी इमारत पाडून त्याठिकाणी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे तातडीने पाठविण्याचे आदेश देण्यात आले.
१४ गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव
फलटण शहराच्या हद्दवाढीचा विषयही बैठकीत महत्त्वाचा ठरला. शहरालगतच्या १४ गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या दोन्हींच्या हद्दीत न येणाऱ्या ‘त्रिशंकू’ भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री सचिवालयाकडे थेट अहवाल
या बैठकीतील निर्णय आणि त्यावरील कार्यवाहीचा सविस्तर प्रगती अहवाल थेट मुख्यमंत्री सचिवालयाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्रानंतर फलटणच्या प्रलंबित प्रश्नांना शासनस्तरावर गती मिळाल्याचे चित्र आहे.
आता बैठकीत दिलेल्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.
एव्हीबी माझा | सातारा प्रतिनिधी













