सोमंथळी बस स्टॉपसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक! १५ ऑगस्टपूर्वी काम सुरू न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

सोमंथळी बस स्टॉपसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!

१५ ऑगस्टपूर्वी काम सुरू न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

फलटण | प्रतिनिधी

फलटण–बारामती महामार्गावर सोमंथळी गावासाठी प्रवासी बस स्टॉप तातडीने बांधून द्यावा, तसेच बस स्टॉपच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक उभारावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी बस स्टॉपचे काम सुरू करून पूर्ण करण्याबाबत प्रशासन व संबंधित हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोमंथळी गाव फलटण–बारामती महामार्गालगत वसलेले असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. गावातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसची वाट पाहण्यासाठी सध्या उन्हात व पावसात महामार्गाच्या कडेला उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सोमंथळी येथे दररोज ५०० पेक्षा अधिक प्रवासी ये-जा करतात, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर बस स्टॉप असणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बस स्टॉप नसल्यामुळे प्रवाशांना महामार्गालगत उभे राहावे लागत असून, भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम आहे.

बस स्टॉप बांधून देण्याची जबाबदारी संबंधित हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची असल्याचे सांगत संघटनेने यापूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींना लेखी व तोंडी स्वरूपात मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत लेखी आश्वासनाची मागणी

या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी सोमंथळी गावासाठी प्रवासी बस स्टॉप बांधून पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. तसेच बस स्टॉपच्या दोन्ही बाजूंना आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारून प्रवाशांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आश्वासन न मिळाल्यास १५ ऑगस्टला रास्ता रोको

प्रशासनाकडून १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत बस स्टॉपबाबत लेखी आश्वासन मिळाले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमंथळी ग्रामस्थांच्या सहभागाने बस स्टॉपच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

“आम्हाला आंदोलन करायचे नाही; मात्र शासन व प्रशासनाने आमच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे,” अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित हायवे कंपनीला सूचना देत सोमंथळी बस स्टॉपचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष विक्रम पवार, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे तसेच बाळासाहेब शिपुकले, बापूराव फरांदे, अशोक खलाटे, कांतीलाल अहिवळे, जगन्नाथ अहिवळे, अविनाश पोकळे, प्रल्हाद अहिवळे आणि आनंद आहिवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें