गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा थेट हायकोर्टात! महायुतीच्या १२ संचालकांना समन्स; २ नोव्हेंबरला निर्णायक सुनावणी

गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा थेट हायकोर्टात! महायुतीच्या १२ संचालकांना समन्स; २ नोव्हेंबरला निर्णायक सुनावणी

कोल्हापूर |

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची निवड आता थेट उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचली आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेला गैरहजर राहिलेल्या महायुतीच्या १२ संचालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने समन्स बजावले असून न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे.

१३ विरुद्ध १२; बहुमत असूनही अध्यक्षपदाचा पेच!

गोकुळच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. त्यामुळे समविचारी आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतानाही अध्यक्षपदाची निवडणूक वादात अडकली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगत महायुतीचे १२ संचालक सभेला गैरहजर राहिले. परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली.

१३ संचालकांची समांतर सभा; शशिकांत चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर

सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच समांतर सभा घेत शशिकांत आनंदराव पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या निवडीला मान्यता दिली नाही.

यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. अध्यक्षपदाची निवड वैध ठरवावी आणि प्रशासक मंडळाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

न्यायालयाने १२ संचालकांसह राज्य सरकारलाही केले प्रतिवादी

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सभेच्या गणपूर्तीचा मुद्दा आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या इतिवृत्ताबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच गैरहजर राहिलेल्या महायुतीच्या १२ संचालकांसह राज्य सरकारला याचिकेत प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार, २ नोव्हेंबर रोजी होणार असून याचिका प्रथम क्रमांकावर सुनावणीस येणार असल्याचे वृत्त आहे. या कालावधीत राज्य सरकार किंवा अन्य कोणत्याही पक्षाने घेतलेली पावले अंतिम न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सतेज पाटील विरुद्ध हसन मुश्रीफ संघर्षाला धार

गोकुळच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावावरूनही राजकीय चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महायुतीचे सर्व १२ संचालक पुढील अध्यक्ष निवडीच्या बैठकीला उपस्थित राहतील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

आता २ नोव्हेंबरकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष!

गोकुळमध्ये १३ संचालकांचे बहुमत असूनही अध्यक्षपदाचा तिढा सुटत नसल्याने सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे. न्यायालय १३ संचालकांच्या निवडीला मान्यता देणार की निवडणूक प्रक्रियेतील नियमांनुसार पुढील मार्ग निश्चित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या सत्तेची चावी अखेर कोणाच्या हाती जाणार? सतेज पाटील यांची रणनीती यशस्वी होणार की महायुतीचा डाव निर्णायक ठरणार? याचे उत्तर २ नोव्हेंबरच्या सुनावणीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

संपादक : विजय भिसे एव्हीबी माझा न्यूज

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें