येरगव्हाण ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा
माजी पंचायत समिती सभापती शाम रणदिवे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार
कोरपना | प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील येरगव्हाण ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती शाम रणदिवे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना यांच्याकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या तक्रारीमुळे तालुक्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
रणदिवे यांनी आपल्या तक्रारीत ग्रामपंचायतीच्या प्रशासनातील विविध बाबींसह ग्रामसभा व विविध समित्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संबंधित प्रकरणातील नोंदी, ठराव, आर्थिक व्यवहार तसेच शासन नियमांचे पालन झाले आहे की नाही, याचीही पडताळणी करण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले असल्याची माहिती मिळाली आहे.
या तक्रारीनंतर येरगव्हाण ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून प्रशासन याची कोणत्या पद्धतीने दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी व दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही रणदिवे यांनी केली आहे.












