फलटण तालुक्यात कृत्रिम दूध बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची मोठी कारवाई!

फलटण तालुक्यात कृत्रिम दूध बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची मोठी कारवाई!

पाच जणांवर गुन्हा दाखल; सोमनाथ डेअरीचे संचालक आणि पुरवठादार रडारवर

रासायनिक पावडर, मिक्सरसह मुद्देमाल जप्त; ‘BNS’ आणि ‘FDA’ कायद्यानुसार कारवाई

 फलटण प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील मौजे होळ येथे गाईच्या दुधात रासायनिक पावडर व पाणी मिसळून कृत्रिम आणि मानवी आरोग्याला अत्यंत घातक असे भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे दुग्ध व्यवसायातील भेसळ बहादरांचे धाबे दणाणले आहेत.

 गोपनीय माहितीवरून टाकण्यात आला छापा 

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १२ जुलै रोजी सकाळी १०:३५ वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे (वय ४८, रा. सातारा) व फलटण ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मौजे होळ येथील दिलीप भीमराव भोसले यांच्या गाईच्या गोठ्याजवळील खोलीवर पंचांसमक्ष अचानक छापा टाकल.

 रासायनिक पावडर्स आणि मिक्सर जप्त 

या छाप्यात सौ. मंगल भोसले व त्यांचे कुटुंबीय गाईच्या दुधात भेसळ करण्यासाठी घातक रसायने मिसळत असल्याचे रंगेहात आढळून आले. घटनास्थळावरून कृत्रिम दूध बनवण्यासाठी वापरली जाणारी ‘Whey Permeate Powder Spray Dried’ आणि ‘Instant Tea Coffee Creamer’ (Non-Dairy Creamer) या पावडर्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तसेच या पावडर्स दुधात एकजीव करण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक मिक्सरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या पदार्थांचे कायदेशीर नमुने (Samples) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित मुद्देमाल सील केला आहे.

बारामतीच्या ‘सोमनाथ डेअरी’ला होत होता पुरवठा 

तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून याचे धागेदोरे थेट बारामती तालुक्यापर्यंत गेले आहेत. आरोपी हे या रासायनिक पावडर्स पाण्यात विरघळवून ते गाईच्या अस्सल दुधात मिसळत असत. हे तयार झालेले कृत्रिम/भेसळयुक्त दूध बारामती तालुक्यातील ‘सोमनाथ डेअरी, वडगाव निंबाळकर’ येथे पुरवले जात होते. तसेच या भेसळीसाठी लागणाऱ्या पावडर्सचा मुख्य पुरवठा नीरा येथील ‘मोरे’ नामक व्यक्तीकडून केला जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

या आरोपींवर गुन्हे दाखल 

सार्वजनिक आरोग्याशी खेळून गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी खालील संशयितांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 415/2026 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:१) सौ. मंगल दिलीप भोसले (रा. होळ, फलटण)२) श्री. दिलीप भीमराव भोसले (रा. होळ, फलटण)३) श्री. कुणाल दिलीप भोसले (रा. होळ, फलटण)४) श्री. मोरे (संशयित पावडर पुरवठादार, रा. नीरा)५) सोमनाथ डेअरीचे जबाबदार संचालक व मालक (रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती)

या सर्व आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ६१, १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम (२००६) मधील कलम २६, २७, ५९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 पोलिसांचा सखोल तपास सुरू 

या कृत्रिम दूध निर्मितीच्या पुरवठा साखळीत (Supply Chain) अनेक मोठ्या व्यक्तींचा आणि डेअरी चालकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि बँक खात्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें