भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाला नगराध्यक्षांकडून अनोखी भेट, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील कृतीने युवक भारावले

भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाला नगराध्यक्षांकडून अनोखी भेट, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील कृतीने युवक भारावले

 

फलटण प्रतिनिधी : देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करून भारतीय सैन्यात निवड झालेल्या युवकाचा फलटण शहरात उत्साहात सत्कार करण्यात आला. मात्र या आनंदोत्सवाला वेगळी उंची मिळाली ती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दाखवलेल्या आत्मीयतेमुळे. त्यांच्या एका साध्या पण भावनिक कृतीने उपस्थित युवकांसह नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून शहरभर या प्रसंगाची चर्चा सुरू आहे.

दिनांक १५ रोजी रात्री नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे सातारा येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम पार पाडून फलटण शहरात आले होते. शहरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी ते नगरसेवक संदीप चोरमले यांच्या समवेत तत्काळ रात्रीच्या वेळी बाहेर पडले. ब्राम्हण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते मारवाड पेठ मार्गे जात असताना काही युवक एका तरुणाला खांद्यावर घेऊन जल्लोष करताना त्यांना दिसले. रात्रीच्या वेळी सुरू असलेला हा आनंदोत्सव पाहून नगराध्यक्षांनी तात्काळ आपली गाडी थांबवली आणि नेमका काय प्रकार सुरू आहे याची विचारपूस केली.

यावेळी उपस्थित युवकांनी सांगितले की, हवालदार सुदाम भिमराव जाधव यांचे नातू तसेच सुभेदार देवदास जाधव यांचे चिरंजीव प्रणव देवदास जाधव याची भारतीय सैन्यात निवड झाली असून त्याच्या यशाचा आनंद मित्रमंडळी साजरा करत आहेत. ही माहिती समजताच नगराध्यक्षांनी प्रणव जाधव याचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, शुभेच्छा देऊन नगराध्यक्ष पुढे निघून गेले होते. मात्र काही अंतर गेल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडी थांबवली. त्यांच्या मनात त्या युवकाबद्दलचा सन्मान आणि प्रेमाची भावना अधिक दृढ झाली होती. ते पुन्हा गाडी थांबवून युवकांजवळ आले आणि प्रणव जाधव याला जवळ बोलावले. यावेळी त्याने सूरज भिसे पाटील यांच्या स्वरूपा अकॅडमी मधील असल्याचे सांगितले, यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खिशातील पेन काढून प्रणवच्या कुडत्याच्या कॉलरला लावला आणि पाठीवर शाब्बासकीची थाप टाकत अत्यंत भावनिक शब्दांत म्हणाले, “माझ्याकडे तुला देण्यासाठी आत्ता काही नाही, पण माझ्याकडे हे पेन आहे. हेच तुला भेट म्हणून देतो. देशसेवेत मोठं नाव कमव.” असे म्हणून स्वतःच्या खिशातील पेन काढून भेट म्हणून दिला.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या या अनपेक्षित आणि मनाला भिडणाऱ्या कृतीमुळे उपस्थित युवक भारावून गेले. काही क्षणांसाठी परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. उपस्थित तरुणांनी टाळ्यांच्या गजरात नगराध्यक्षांचे स्वागत केले. त्यानंतर युवकांनी नगराध्यक्षांसोबत फोटो घेण्याची विनंती केली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत आपुलकीने सर्व युवकांसोबत छायाचित्र काढले.

या प्रसंगानंतर शहरात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संवेदनशील स्वभावाची चर्चा रंगू लागली आहे. कोणताही दिखावा न करता एका सामान्य सैनिकाच्या मुलाच्या यशाला दिलेला सन्मान आणि त्यासाठी केलेली साधी पण हृदयस्पर्शी कृती अनेकांच्या मनाला भावली. सामाजिक माध्यमांवरही या प्रसंगाबाबत कौतुक व्यक्त केले जात असून “देशसेवेला जाणाऱ्या युवकांचा सन्मान हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

फलटण शहरातील युवकांमध्ये भारतीय सैन्याबद्दल असलेला अभिमान आणि देशसेवेची भावना या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली असून प्रणव जाधव यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें