साखर पुड्याला आले आणि लग्न लावून गेले, बडेजावं न करता आर्थिक बचतीचा संदेश: राजपूत समाजात आदर्श विवाह सोहळा संम्पन्न
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
आजच्या धकाधीच्या जीवनात सर्वत्र वेळेला महत्व दिले जाते. सध्या महागाईने तोंड वर काढले असून लग्नात दगदागिने किती चढविले जातील याला महत्व दिले जाते. या सर्व गोष्टीला फाटा देत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता संवादातून एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सटाणा येथील पवार व पिंप्री ता. चाळीसगाव येथील महाले परिवाराने राजपूत समाजात एक चांगला आदर्श दाखवीत रूढी परंपराना फाटा दिला आहे. याबाबत माहिती अशी की, पिंप्री ता. चाळीसगाव येथील पत्रकार महेंद्रसिंग महाले यांच्या कन्येचा साखरपुडा व विवाह एकाच वेळी साधेपणाने पार पडत राजपूत समाजाला आदर्श विवाहाचा संदेश देण्यात आला. सटाण्याचे कैलासवासी राजेंद्र पवार यांचे ज्येष्ठ पुत्र वर ॲड. करण पवार यांच्यासोबत पत्रकार महेंद्र महाले यांची कन्या वधू सुषमा महाले यांचा हा विवाह सोहळा काल रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चाळीसगाव शहरातील दूध सागर मार्गावरील अर्योपहार हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वरा कडील निलेश पवार,ॲड हिरामण सोनवणे, ॲड ए. एल. पाटील, ॲड विजय पवार यांच्यासह त्यांच्या परिवारातील ज्येष्ठ मंडळींनी साखरपुड्यानंतर पुढील औपचारिक कार्यक्रम न करता तात्काळ विवाह करण्याचा सल्ला दिला. त्यास वधू कडील ज्येष्ठ मंडळींनीही सकारात्मक होकार देत महागाईच्या युगात साधेपणाने लग्न करण्यासाठी वधू-वराच्या संमतीने साधेपणा, वेळ व खर्च बचतीचा विचार करत निर्णय घेतला. अनावश्यक दिखावा टाळत सामाजिक बांधिलकी जपत पार पडलेल्या विवाहात व्हॉईस ऑफ मिडिया या अंतरराष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांचे देखील यात महत्वाचे योगदान लाभले. या विवाह सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजात वाढत चाललेल्या खर्चिक विवाह पद्धतीला हा एक सकारात्मक पर्याय ठरला आहे.













