कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचे बैलावर बसून आंदोलन
तहसील कार्यालयात कर्जमुक्तीच्या घोषणांनी तहसील परिसर दणाणला
चंद्रपूर मनोज गोरे –
शेतकरी कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आज राजुरा तहसील कार्यालयात एका शेतकऱ्याने आगळेवेगळे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलावर स्वार होत तहसील कार्यालय परिसरात पोहोचलेल्या गोरेगाव येथील दिवाकर पहानपटे या शेतकऱ्याने कर्जमाफीच्या घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढते शेती खर्च, नैसर्गिक संकटे, पिकांचे घटते उत्पादन आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा मार्ग निवडला. बैलावर बसून तहसील कार्यालय परिसरात फेरी मारत त्याने “शेतकरी कर्जमुक्त करा”, “कर्जमाफी द्या”, “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा दिल्या.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी, विविध कामांसाठी आलेले नागरिक तसेच परिसरातील लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी या आंदोलनाचे छायाचित्रण आणि चित्रीकरण केले. काही काळ तहसील परिसरात या आंदोलनाचीच चर्चा रंगली होती.
शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, वारंवार नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.












