कपाशीच्या उत्पादनात चांगली घट, सोयाबीन पिकाने दिला दगा
बोंडअळीच्या आक्रमणाने शेतकरी हवालदिन
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाने दगा दिल्यानंतर कापसाचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट आली असतानाच आता बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कापूस उत्पादक चांगलाच हादरला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याचा वाली कुणीच दिसत नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हाती लागले नाही. त्याशिवाय येलो मोझेंक आणि चारकोल रॉट रोगाने सोयाबीनला ग्रासले. त्यामुळे सोयाबीनची उतारी अत्यंत कमी प्रमाणात झाली.
सोयाबीनच्या अत्यल्प उत्पन्नामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच आता कपाशीवर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र कपाशीला वातावरणातील बदलामुळे आणि अतिवृष्टीमुळे बोंड कमी आणि पालाच अधिक दिसून येत होता. त्यामुळे उत्पन्न कमी प्रमाणात झाल्याचा अंदाज असतानाच अलीकडे उरल्या सुरल्या – बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे आता कापसाच्या उत्पन्नाची आशा धूसर झाली आहे.
– अर्धेअधिक बोंडाचा कापूस खराब – बोंडअळीमुळे कापसाचे अर्धेअधिक
बोंडाचा कापूस खराब निघतो. शिवाय काही बोंडातून कापूस ही निघत नाही. त्यामुळे सहाजिकच कापसाच्या उत्पादनात घट येते. इतकेच नव्हे तर कापूस बोंड खराब होत असल्यामुळे कापसाच्या भावातही फरक पडतो. त्याशिवाय अत्यल्प भावही मिळतो. परिणामी शेतकऱ्यांचे
नुकसान होते. आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना पुन्हा बोंडअळीने हल्ला चढवल्यामुळे कापूस उत्पादक चांगलाच हतबल झाला आहे. कापसाला भाव नाही, हमीभावातही खरेदी करण्यासाठी शासनाचे किचकट नियम शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन पिकाने दगा दिला. कपाशीचे पीक बऱ्यापैकी होईल म्हणून कापसाची लागवड केली. परंतु कपाशीला पाहिजे त्या प्रमाणात बोंड आली नाही. थोडेफार बोंड पराहाटीला धरलीत. त्याचा तरी किमान कापूस निघेल, अशी अपेक्षा होती. पण, मागील पंधरा दिवसापासून कपाशीच्या बोंडामध्ये बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे बोंडाच्या अर्ध्या पाकळ्या खराब निघाल्या. यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येईल.

– उत्तमराव पेचे शेतकरी परसोडा
यंदा कापसाचे क समाधानकारक येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अतिवृष्टी वातावरणातील अचानक आणि बदलामुळे कपाशीला बोंड कमी आणि पालाच अधिक दिसून येते. त्यातही अलीकडे उरल्या-सुरल्या बोंडामध्ये बोंडअळीने आक्रमण केले, त्यामुळे कापसाच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे.

विवेक रणदिवे, शेतकरी, धानोली
यावर्षी कपाशीची लागवड केली. प्रारंभी, कपाशीचे पीक जोमदार दिसू लागले. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे प-हाटीला बोंडधारणा झाली नाही. थोड्याफार प्रमाणात बोंड दिसू लागली. मात्र त्या बोंडात बोंडअळीने हल्ला केल्यामुळे बोंडाच्या दोन पाकळ्या खराब आणि दोन पाकळ्या बऱ्या आहेत, यामुळे कापसाच्या उत्पन्नात प्रचंड घट आली.

– संकेत धगडी – शेतकरी, कोरपना
अडीच एकर शेतात आतापर्यंत केवळ तीन क्विंटल कापूस निघाला. कपाशी पिकावर लाल्या रोगाने तर आक्रमण केलेच पण अलीकडे बोंडअळीने हल्ला चढविल्यामुळे कापसाचे उत्पन्न समाधानकारक दिसत नाही. त्याशिवाय बाजारात कापसाला समाधानकारक भावही मिळत नाही. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा पेच पडला आहे.
संजय सोयाम , शेतकरी, माथा













