चाळीसगाव नगरपालिका निवडणूक प्रभाग १२ मध्ये भाजपची अंतर्गत अस्वस्थता बंडखोरीची चाहूल नाराजीची ठिणगी आणि बदलणारी समीकरणे
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव:-
चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ हा अचानक राजकीय वादळाचा केंद्रबिंदू बनला असून, भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावनांवर घाव करणारे निर्णय घेतले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे व्यक्त होतांना दिसत आहे, या नाराजीचे रुपांतर थेट बंडाच्या दिशेने होते की काय अचे चित्र या प्रभागात दिसुन येत आहे. वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहणारे, पक्षानिष्ठा जपणारे, संकटांच्या काळात खांदे देणारे आणि तळागाळातील कामातून स्वतःला सिद्ध करणारे सागर चौधरी, रणजित देशमुख आणि प्रदीप मराठे या कार्यकर्त्यांची उमेदवारी अंतिम क्षणी नाकारण्यात आल्याने पक्षातच काहीशी नाराजी बगायला मिळत आहे. दुसऱ्या पक्षातून आयात करुन या पक्षात नुकतेच आलेल्या उमेदवाराला प्राधान्य मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठपने योगदान दिल्यानंतर अचानकपणे डावलण्याने प्रभागातील कार्यकत्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या तीन पैकी दोन भाजपाच्या निष्ठावंत शिलेदारांनी अपक्ष उमेदवारी कायम राखण्याचा निर्णय घेतल्यास या प्रभागात भाजपचे गणित कोलमडण्याची भीती पक्षातच व्यक्त होत आहे. यात मतविभाजनाचा धोका वाढला असून, भाजपच्या या एकचूक निर्णयामुळे संपूर्ण निवडणूकच वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक १२ हा पारंपरिकरीत्या लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या शहर विकास आघाडीसाठी अनुकूल मानला जाणारा प्रभाग असल्याची गणना नेहमी होत असते. अशा परिस्थितीत भाजपच्या घरातून उठलेले बंड म्हणजे विरोधकांसाठी गोड संधीच मानली जाईल. कार्यकर्त्यांमध्ये नुकतेच बाहेरून आलेल्या उमेदवार हा मुद्दा मोठ्या वेगानेवाढत आहे. पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराला मिळणारा पाठिंबा हा मोठा प्रश्न बनला आहे. सागर चौधरी, रणजित देशमुख आणि प्रदीप मराठे यांनी पक्षाच्या माध्यमातून केलेली वर्षानुवर्षांची सामाजिक कामे, प्रभागात समस्या सोडवण्याचे प्रयत्न, संघटनात्मक कार्यक्रमांतील सक्रियता या सर्वांचा ठसा मतदारांच्या मनात खोलवर आहे. त्यामुळे त्यांना डावलल्याचा आघात त्यांच्या समर्थकांच्या मनात तीव्रतेने उमटला असून, ही नाराजी जर मतपेटीत उतरली तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो. स्थानिक स्वराज्य निवडणूक ही फक्त उमेदवारीची रणनिती नसते ती असते भावना, विश्वास, लोकांशी जोडलेले नात्यांचे बंध आणि स्थानिक नेतृत्वाचा वारसा. आता खरी परीक्षा भाजप नेतृत्वाची आहे. निष्ठावंतांना सामावून घेऊन समन्वय साधायचा की बंडखोरीने निवडणूक अधिक गुंतागुंतीची करायची? प्रभाग क्रमांक १२ मध्ये बदलणारी समीकरणे, वाढणारी नाराजी आणि अंतर्गत बंडाची चाहूल या सर्वांचा परिणाम निकालावर होणार हे स्पष्ट आहे. या प्रभागातील प्रत्येक हालचाल आता चाळीसगावच्या राजकारणात निर्णायक ठरणार आहे.











