पद्मश्री शा.साबळे पतसंस्थेत हुकूमशाही! सभासदांचा सुधारणांसाठी संताप
पसरणी, ता. १७ सप्टेंबर २०२५: पसरणी (ता. वाई) येथील पद्मश्री शाहीर साबळे सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराने सभासद संतप्त झाले आहेत. संस्था पद्मश्री शाहीर साबळे यांच्या नावाने ओळखली जाते, पण संचालकांनी त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी कधीच साजरी केल्याचे गावकऱ्यांनी पाहिले नाही. यामुळे संस्था केवळ नावापुरती राहिल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल, अशी आशा गावकरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना होती. मात्र, घरातील मतांच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांच्या व्यवहारात बदल दिसत नाही. सहकारी संस्थांच्या नियमांनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल सात दिवस आधी वितरित करणे बंधनकारक आहे. पण संचालकांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी अहवाल वाटप करून अवघ्या चार दिवसांत, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सभा घेतली. तक्रार अर्ज ९ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची अवास्तव मुदत ठेवून त्यांनी मनमानीचे प्रदर्शन केले.
आकडेवारीत फेरफार करून आकडेवारीत गोंधळ केल्याचे निदर्शनास आले आहे.
संस्थेचा वार्षिक अहवाल हा कामकाज आणि आर्थिक व्यवहारांचा आरसा असतो. मात्र, यंदाच्या अहवालातील पान क्रमांक पाचवरील आकडेवारीत गंभीर चूक आढळली. ठेव तारण कर्जाची रक्कम ३,२१,९३,९७६ रुपये आणि हायर परचेस कर्जाची रक्कम १,११,२८,५९९ रुपये दाखवली, पण प्रत्यक्षात ही आकडेवारी उलट आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम कोटींमध्ये आहे. सभेत यावर प्रश्न उपस्थित झाल्यावर संचालकांनी “प्रिंटिंग मिस्टेक” सांगून सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
काही सुज्ञ सभासदांनी थकीत कर्जदारांची यादी जाहीर करण्याची मागणी केली. संचालकांनी “उद्या यादी देऊ” असे उडवाउडवीचे उत्तर देत नियम धाब्यावर बसवले.
थकीत कर्जदारांची यादी लपवली!
यामुळे काही संचालकच कर्जदार असल्याचा संशय बळावला आहे. काही कर्जदारांचे वैयक्तिक कर्ज ३० लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जाते, पण सभेत केवळ २२ लाखांची थकबाकी असल्याचा तोंडी आकडा सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला.
परिसरातील इतर सहकारी संस्थांच्या तुलनेत या संस्थेचे कर्जवाटप जास्त आहे, पण नफा मात्र अर्धा. त्यामुळे
कर्जवाटप जास्त, नफा कमी.
इतर संस्थांचा नफा दुप्पट असल्याचे अहवाल सांगतात. संचालकांनी नातेवाइकांना किंवा जवळच्या व्यक्तींना कमी व्याजदराने कर्ज दिले किंवा “वन टाइम सेटलमेंट”च्या नावाखाली समायोजन केल्याचा संशय सभासदांनी व्यक्त केला आहे.
३५ वर्षे जुन्या संस्थेत केवळ ७५० सभासद आहेत. सभासद संख्या वाढवण्याबाबत विचारले असता, संचालकांनी “आमच्या विचारांच्याच लोकांना सभासद करू, इतरांना नाही” असे धक्कादायक उत्तर दिले. तांत्रिक प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी “पद्मश्रींचा अपमान” किंवा “गावाचा अपमान” अशी भावनिक आवाहने करत चुका लपवण्याचा प्रयत्न झाला.
संचालकांनी नातेसंबंधांचा गैरफायदा घेऊन संस्था ताब्यात ठेवली असली, तरी ज्यांच्या मतांमुळे ते सत्तेत आहेत, त्याच सभासदांची फसवणूक होत आहे. सभासदांनी पारदर्शक कारभार, थकीत कर्जदारांची यादी आणि आर्थिक व्यवहारांची स्पष्टता यासाठी आग्रह धरला आहे. सभासदांनी पारदर्शक कारभाराची मागणी केली आहे.
चौकट:
संचालक मंडळाने आपल्या हितसंबंधांसाठी संस्थेचा वापर केला असला, तरी सभासदांचा विश्वास गमावला आहे. पारदर्शकता आणि सुधारणांशिवाय ही संस्था खऱ्या अर्थाने पद्मश्री शाहीर साबळे यांच्या नावाला साजेसी होऊ शकणार नाही.













