फलटण औद्योगिक क्रांतीकडे: महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या नव्या सुविधेचे रामराजेंच्या हस्ते उद्घाटन

फलटण औद्योगिक क्रांतीकडे: महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या नव्या सुविधेचे रामराजेंच्या हस्ते उद्घाटन

फलटण प्रतिनिधी:

दि १२ जून २०२५

“उद्योगांना पुणे आणि मुंबईत आता पुरेशी जागा उपलब्ध नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा आणि शिरवळ या परिसरांमध्ये उद्योगांसाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत,” असे प्रतिपादन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या फलटण येथील नव्या सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

 

महिंद्रा लॉजिस्टिक्सने फलटण येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वेअरहाउस उभारले असून, या सुविधेचे उद्घाटन श्रीमंत रामराजेंच्या हस्ते पार पडले. या वेळी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे सी इ ओ हेमंत सिक्का,कमिन्स कंपनीच्या एम डी श्वेता आर्या, श्रीमंत अनिकेतराजें नाईक निंबाळकर, वरिष्ठ अधिकारी, स्थानिक उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रामराजेंनी आपल्या भाषणात फलटण तालुक्याच्या औद्योगिक वाटचालीवर प्रकाश टाकताना सांगितले, “केवळ १५ वर्षांपूर्वी या तालुक्यात शेतीशिवाय दुसरे काहीच नव्हते. मात्र आज कमिन्स, महिंद्रा, एशियन पेंट्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांमुळे तालुक्याचा चेहरामोहराच बदलला आहे. हजारो युवकांना रोजगार मिळाला आहे.”

 

ते पुढे म्हणाले, “आमच्या आजोबांनी १०० वर्षांपूर्वी कालवा आणला, त्यामुळे तालुक्यात सिंचनाचा प्रश्न सुटला आणि आता या भागात चार-चार साखर कारखाने यशस्वीपणे सुरू आहेत. ही केवळ शेतीची नाही, तर आता औद्योगिक क्रांतीचीही गाथा आहे.”

 

महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या या नव्या प्रकल्पामुळे फलटण परिसरात आणखी रोजगार निर्मिती होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. तसेच या सुविधेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लॉजिस्टिक्स सेवा अधिक गतिमान होईल, असा विश्वास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें