:🚨 साखरवाडीत मुंडे साहेबांच्या आदेशाला ‘केराची टोपली’; अवैध गुटखा-मावा विक्री जोमात, पोलीस प्रशासन सुस्त!
फलटण. प्रतिनिधी
साखरवाडी:अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचे कडक आदेश दिले आहेत. मात्र, साखरवाडी परिसरात या आदेशाची उघडउघड पायमल्ली होताना दिसत आहे. वरिष्ठ पातळीवरून एवढे कडक आदेश असतानाही साखरवाडीत गुटखा आणि माव्याची विक्री राजरोसपणे सुरू असून, स्थानिक पोलीस प्रशासन मात्र सुस्त भूमिकेत असल्याचा आरोप सुजाण नागरिकांमधून केला जात आहे.
🛑 ‘मुंढे पॅटर्न’ला स्थानिक यंत्रणेचा हरताळ!
कमिशनर तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांविरोधात आक्रमक पावले उचलली आहेत. गुटखा विक्री हा केवळ गुन्हा नसून तो तरुण पिढीला उद्ध्वस्त करणारा संघटित गुन्हा मानून कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. परंतु, साखरवाडीत या ‘मुंढे पॅटर्न’चा कोणताही धाक उरलेला दिसत नाही. गल्लीबोळातील टपऱ्यांवर आणि दुकानांमध्ये छुप्या आणि काही ठिकाणी उघडपणे प्रतिबंधित गुटखा आणि मावा विकला जात आहे.
❓ पोलीस प्रशासन नक्की कोणाच्या पाठीशी?
ह्या अवैध विक्रीमुळे परिसरातील तरुण पिढी आणि शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला दिसणारा हा अवैध धंदा पोलिसांना का दिसत नाही? की पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक करत आहे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर आता संशयाची सुई निर्माण झाली आहे.
🔥 नागरिकांची मागणी: थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करा!
साखरवाडीतील सुजाण नागरिकांनी आता या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवर कारवाई होत नसेल, तर थेट वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SP) आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ पथकाने साखरवाडीत धाडी टाकून या गुटखा माफियांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना जेलची हवा दाखवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या कडक बातमीनंतर तरी स्थानिक पोलीस प्रशासनाला जाग येणार की गुटखा माफियांचे राज्य असेच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













