चाळीसगाव बाजार समितीत थेट ‘शेतकरी ते खरेदीदार’ लिलाव पद्धतीचा शुभारंभ पहिल्याच दिवशी ३५० वाहनांची आवक
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कमिशन एजंट विरहित थेट ‘शेतकरी ते खरेदीदार‘ लिलाव पद्धतीचा शुभारंभ २ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश चव्हाण यांच्या हस्ते या नवीन लिलाव पद्धतीचे उद्घाटन करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजार समितीत मक्याची तब्बल ३५० वाहनांची आवक झाली. या लिलावात मक्याला प्रति क्विंटल २५०० ते ३०५१ रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या नवीन पद्धतीमुळे कमिशन एजंट विरहित थेट व्यवहार होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा अधिक चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. या पद्धतीमुळे मक्याच्या दरात प्रति क्विंटल सरासरी ५० ते ६० रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे तालुक्याबाहेरील नवीन व्यापाऱ्यांनीही या लिलावात सहभाग नोंदविला.
यावेळी बाजार समितीचे सभापती किशोर भिकनराव पाटील, उपसभापती राहुल राजेंद्र पाटील, संचालक रवींद्र पाटील, मच्छिंद्र राठोड, प्रदीप पाटील, साहेबराव राठोड, शैलेंद्रसिंग पाटील, निलेश वाणी, प्रभाकर घुमरे यांच्यासह सहसचिव सतीशराजे पाटील, प्रशांत मगर, प्रवीण वाघ, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीनंतरची रक्कम रोख, आरटीजीएस किंवा चेकद्वारेच स्वीकारावी. खरेदीदाराकडून पैसे देण्यास टाळाटाळ झाल्यास बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाजार समितीने लिलावासाठी नवीन वेळापत्रकही जाहीर केले असून, शेतमालाची आवक सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्वीकारली जाणार आहे. मुख्य लिलाव सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहेत. या नवीन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना पारदर्शक व्यवहार आणि योग्य दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास बाजार समिती प्रशासनाने व्यक्त केला आहे.













