दिल्लीच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विडणीच्या श्रीनिधी अभंगची सुवर्णभरारी!
१४ वर्षे वयोगटातील ३६ किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत पटकावले सुवर्णपदक; विडणीच्या शिरपेचात मानाचा तुरा
विडणी | प्रतिनिधी
दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत फलटण तालुक्यातील विडणी गावची कन्या श्रीनिधी निखिल अभंग हिने दैदीप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. १४ वर्षे वयोगटातील ३६ किलो वजन गटात श्रीनिधीने आपल्या कुस्ती कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विडणी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत श्रीनिधीने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. गटातील कुस्त्यांमध्ये प्रभावी विजय मिळवत तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीतील कुस्तीतही एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतदेखील प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
श्रीनिधी अभंग ही पैलवान तानाजी महाराज अभंग यांची नात असून पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले निखिल अभंग यांची ती कन्या आहे. कुस्तीची परंपरा लाभलेल्या कुटुंबातील श्रीनिधीने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित मानले जात आहे.
तिच्या या यशाबद्दल विडणी ग्रामस्थ तसेच भैरवनाथ तालीम मंडळाच्या वतीने श्रीनिधीचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या या कामगिरीमुळे विडणीसह फलटण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लहान वयात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणाऱ्या श्रीनिधीच्या या यशाने ग्रामीण भागातील मुलींसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. भविष्यातही तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत .












