मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीला धडक देणार… लक्ष्मण शिरसाठ
चाळीसगाव प्रतिनिधी :-
मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत ९ ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करून मराठ्यांनी जसा मुंबईत दणका दिला होता तसा दणका आता दिल्लीला देतील आणि आरक्षणा बाबत सकारात्मक निर्णय झाल्या शिवाय दिल्ली सोडणार नाही असा ठाम निश्चय मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक बापुसाहेब लक्ष्मण शिरसाठ पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मुंबई येथे आयोजित मराठा संघटनांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मराठा समाज जवळपास ४० वर्षांपासून संघर्ष करीत असून स्व. आण्णासाहेब पाटील स्व. आण्णासाहेब जावळे पाटील स्व. देविदास वडजे सर या नेत्यांनी बलिदान दिले तसेच शेकडो मराठा सेवक तरुणांनी आरक्षणासाठी आंदोलना दरम्यान आत्महत्या केल्यात तरी देखील आरक्षण मिळत नाही आणि समाजाने जेव्हा जेव्हा तीव्र आंदोलने केलीत तेव्हा त्या त्या तत्कालीन सरकारांनी वेळोवेळी फक्त फसवे आश्वासने दिलीत, त्यामुळे समाजाने गुलाल उधळून साजरा केलेला आनंद फार काळ टिकू शकला नाही. महाराष्ट्र सरकारने जेव्हा जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी ते कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकले नाही. एकंदरीत सखोल अभ्यास केला असता मुळात राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकारच नाही त्यामुळे आता दिल्लीत धडक देऊन सरकार कडून आरक्षणाची मर्यादा वाढवायला लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
महाराष्ट्रात आणि केंद्रातही भाजपचेच सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी करावी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आणि मराठा समजला आरक्षण मिळावे असेही शिरसाठ म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जीवाचे रान करून मुंबई बंद पाडली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट पर्यंत निर्णय न घेतल्यास आता केवळ महाराष्ट्रात सीमित न राहता दिल्लीतील जंतर-मंतर येथे तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा निर्धार शिरसाठ यांनी व्यक्त केला.
यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील नानासाहेब जावळे पाटील भिमराव मराठे बापू मालुसरे रुद्र पाटील प्रकाश शिरसाठ नवनाथ पाटील शेडगे पाटील असे महाराष्ट्र भारतील अनेक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.













