गोंडवाना विद्यापीठ कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय गडचिरोली येथेच स्थापन करावे;
👉 कुलगुरूंना सविस्तर प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची सिनेट सदस्य सतीश पडोळे यांची मागणी
गडचिरोली ( चक्रधर मेश्राम)दि. ४ : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी विधान परिषदेत दिनांक २ जुलै २०२६ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री. सतीश पडोळे यांनी कुलगुरूंची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी स्वतंत्र सहसंचालक कार्यालय गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथेच स्थापन करण्यासाठी शासनाकडे तातडीने सविस्तर व अद्ययावत प्रस्ताव सादर करण्याबाबत निवेदन दिले.
निवेदनात श्री. पडोळे यांनी नमूद केले की, गोंडवाना विद्यापीठाच्या दिनांक १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय संकुलात या कार्यालयासाठी आवश्यक जागा आरक्षित करण्यासही अधिसभेने मान्यता दिली असून त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
राज्य शासनाने स्वतंत्र सहसंचालक कार्यालय स्थापन करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने हा निर्णय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संलग्न महाविद्यालयांसाठी अत्यंत दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शासन अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विद्यापीठाने अधिसभेच्या ठरावाचा संदर्भ, विद्यापीठ परिसरात उपलब्ध आरक्षित जागा, आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशासकीय आवश्यकता, विद्यापीठाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र, संलग्न २१८ महाविद्यालयांची संख्या तसेच गडचिरोली येथेच कार्यालय स्थापन करण्यामागील वस्तुनिष्ठ कारणे, उद्दिष्टे आणि त्याचे दीर्घकालीन महत्त्व यांचा समावेश असलेला सविस्तर व अद्ययावत प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.
पडोळे यांनी कुलगुरूंना सांगितले की, गोंडवाना विद्यापीठाची स्थापना आदिवासीबहुल व दुर्गम भागातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी करण्यात आली असून विद्यापीठाचे मुख्यालय गडचिरोली येथे आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संबंधित बहुतांश प्रशासकीय कामकाज गडचिरोलीतच पार पडते. अशा परिस्थितीत स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयही विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये किंवा विद्यापीठ परिसरातच कार्यान्वित झाल्यास विद्यापीठ व सहसंचालक कार्यालय यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होईल, निर्णय प्रक्रियेला गती मिळेल आणि महाविद्यालयांची अनावश्यक धावपळ टळेल.
यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उदाहरण देत सांगितले की, त्या विद्यापीठासाठी स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय विद्यापीठाच्या मुख्यालयातच कार्यरत असून त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठाच्या बाबतीतही कार्यालय मुख्यालयात स्थापन करणे प्रशासनाच्या दृष्टीने अधिक परिणामकारक ठरेल.
ते पुढे म्हणाले की, सहसंचालक कार्यालय अन्यत्र स्थापन झाल्यास विद्यापीठाशी संबंधित कामांसाठी गडचिरोली आणि सहसंचालक कार्यालयाच्या कामांसाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल. त्यामुळे वेळ, पैसा व मनुष्यबळाचा अपव्यय होईल आणि स्वतंत्र कार्यालय स्थापनेमागील मूळ उद्देशच अपूर्ण राहील. याउलट विद्यापीठाच्या प्रशासकीय संकुलात आवश्यक जागा आधीच आरक्षित असल्याने गडचिरोली येथे कार्यालय सुरू करणे अधिक व्यवहार्य, किफायतशीर आणि प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.
राज्य शासनाच्या घोषणेचे स्वागत करताना पडोळे यांनी सांगितले की, या मागणीसाठी शिक्षक संघटना, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना, विविध लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजयभाऊ देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मा. आमदार अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत मांडलेले निवेदनही विद्यापीठाच्या अधिसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावाशी सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर काही माध्यमे व सामाजिक माध्यमांवर स्वतंत्र सहसंचालक कार्यालय चंद्रपूर येथे स्थापन होणार अशा प्रकारच्या निराधार व अप्रमाणित चर्चा सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिसभेचा ठराव, शासनाकडे पाठविण्यात आलेला अधिकृत प्रस्ताव आणि मंत्री महोदयांनी विधान परिषदेत केलेले निवेदन या तिन्ही ठिकाणी चंद्रपूर येथे कार्यालय स्थापन करण्याचा कोणताही उल्लेख किंवा घोषणा नसताना अशा अफवा पसरवून विद्यापीठ परिसरात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अधिकृत कागदपत्रांमध्ये नसलेल्या बातम्या प्रसारित करून शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि जनप्रतिनिधींमध्ये संभ्रम निर्माण करण्यामागील उद्देश काय? शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे काय? अशीही विचारणा त्यांनी केली असून, अशा निराधार चर्चांकडे दुर्लक्ष करून केवळ शासनाच्या अधिकृत निर्णयावरच विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
शासनाने गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेने एकमताने मंजूर केलेल्या ठरावाचा, विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावाचा आणि विद्यापीठाने शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या सविस्तर प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्यालयात, म्हणजेच गडचिरोली येथेच स्थापन करावे, अशी आग्रही मागणी सिनेट सदस्य श्री. सतीश पडोळे यांनी केली.
या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास आदिवासीबहुल व दुर्गम भागातील उच्च शिक्षणाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल आणि हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.













