फलटणच्या वैभवात भर घालणारी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ उद्या!
दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त २५ ऑक्टोबरला आयोजन; ७५० हून अधिक गुडघा प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांच्या वॉकॅथॉनचे विशेष आकर्षण
फलटण (प्रतिनिधी) : आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि आनंदी जीवनाचा संदेश देण्यासाठी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’चे आयोजन रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन, फलटण येथे करण्यात आले आहे. मॅरेथॉनचे यंदा दशकपूर्ती वर्ष असून, ‘Run for Health & Happiness’ ही संकल्पना यंदा राबविण्यात येत आहे.
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आरोग्याबरोबरच अवयवदानाचा संदेश देण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची तीन किलोमीटरची विशेष वॉकॅथॉन होणार आहे.
मॅरेथॉनमध्ये २१, १० आणि ५ किलोमीटर धावण्याच्या शर्यतींसह १२ वर्षांवरील सहभागींसाठी ३ किलोमीटर फन रन आयोजित करण्यात आली आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन किलोमीटरची वॉकॅथॉन विनामूल्य ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेतील विविध वयोगटांतील पुरुष व महिला विजेत्यांना स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी १० हजार, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. एकूण ६० पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
धावपटूंसाठी मार्गावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, झुंबा वॉर्मअप आणि धावणीनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. ऊसशेती, बागा आणि द्राक्षमळ्यांच्या परिसरातून जाणारा निसर्गरम्य मार्ग हेही मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
नागरिकांनी आरोग्य आणि आनंदाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.












