कोरपणा बसस्थानक चौकात ऑटोचालकांची मनमानी; पादचाऱ्यांना मोठा त्रास, पोलिसांचे दुर्लक्ष
कोरपणा मनोज गोरे
कोरपणा शहरातील बसस्थानक चौकात ऑटोचालकांकडून होत असलेल्या अनियंत्रित वाहन उभे करण्याच्या प्रकारामुळे पादचारी व इतर वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात अनेक ऑटो रस्त्याच्या मध्यभागी व चौकातच उभे राहत असल्याने वाहतुकीत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत.
बसस्थानकात येणारे प्रवासी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. चौकात जागा कमी असतानाही ऑटोचालकांकडून नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासन व पोलीस विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बसस्थानक चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या ऑटोवर कारवाई करावी, बसस्थानक परिसरात वाहतूक पोलीस नियुक्त करावेत आणि ऑटोसाठी स्वतंत्र थांबा निश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.













