फलटण नगरपरिषदेत “एकल महिला दिवस” उत्साहात साजरा
फलटण प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्र संघाने २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून घोषित केला असून, त्यानिमित्त फलटण नगरपरिषदेच्या वतीने “एकल महिला दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे एकल महिलांना विविध शासकीय योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मोहिनी मंगेशहेंद्रे, मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या सभापती सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सौ. मीना जीवन काकडे, नगरसेविका सौ. स्वाती राजेंद्र भोसले तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिलांचे स्वागत करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “विधवा” या शब्दाऐवजी “एकल महिला” हा सन्मानजनक शब्दप्रयोग वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात रोजगार, स्वयंरोजगार, उपजीविकेच्या संधी, महिला बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच समाजातील रूढी-परंपरांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
एनयूएलएम विभागप्रमुख श्री. शशिकांत शिरतोडे यांनी बचत गटांची कार्यपद्धती व पीएम स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी योजनेविषयी मार्गदर्शन केले. सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे यांनी संडे बाजार उपक्रमाची माहिती दिली, तर सौ. सुपर्णा अहिवळे यांनी महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास शहरातील विविध बचत गटांच्या महिला प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने एकल महिलांची उपस्थिती होती. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांकडून स्वागत करण्यात आले.
– प्रतिनिधी
एव्हीबी माझा
संपादक : श्री. विजय भिसे












